लाचखोरीनंतर महापालिकेला उपरती

अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना अटक झालेले महापालिकेचे प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित पडला होता. मात्र लाचखोरीचे प्रकरण घडताच या प्रस्तावाला अचानक गती आली आणि प्रस्तावावरची धूळ झटकण्यात येऊन तो प्रस्ताव आता आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

महापालिकेचे प्रभाग अधिकारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. स्वप्निल सावंत यांचाही यात समावेश होता. उत्तन हा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर आहे. याठिकाणचा बराचसा परिसर सीआरझेडने बाधित आहे, तसेच तो ‘ना विकास क्षेत्रात’ही मोडत आहे. त्यामुळे याठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही, परंतु भूमाफिया हे सर्व नियम धाब्यावर बसवून बेधडक अनधिकृत बांधकामे करत होते. या सर्व बांधकामांना प्रभाग अधिकाऱ्यांचा आशीर्वाद होता हे उघड होते. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आयुक्तांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही स्वप्निल सावंत त्याला जुमानत नव्हता. त्यामुळेच त्याला याआधी दोन वेळा निलंबितही करण्यात आले आहे.

निलंबनाचा अवधी संपल्यानंतर मात्र सावंत पुन्हा याच प्रभागात प्रभाग अधिकारी म्हणून रुजू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. प्रभाग अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर सावंत याने आपला पूर्वीचाच कित्ता गिरवण्यास सुरुवात केला. त्यामुळे अखेर त्याची विभागीय चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव महापालिका निवडणुकीच्या आधीच तयार करण्यात आला होता, परंतु गेल्या दोन महिन्यांत हा प्रस्ताव पुढे सरकलाच नाही. दरम्यानच्या काळात अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या सुधीर राऊत यांनी उत्तन आणि आसपासच्या अनधिकृत बांधकामांची जंत्रीच सावंत याच्यापुढे ठेवली. या यादीनुसार सावंत याला १०१ अनधिकृत बांधकामांबाबत चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्याचा तसेच त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता, परंतु या बांधकामांवर कारवाई न करता त्याचा खुलासा सावंत याने अतिरिक्त आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र सावंत याचा खुलासा अतिरिक्त आयुक्तांनी अमान्य केला आणि त्याला कारवाई करण्याबाबतची अंतिम नोटीस बजावली, परंतु त्यानंतरही सावंत याने विशेष धडक मोहीम हाती घेतली नाही.

दरम्यान सावंत याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतरही सावंत याच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव जागेवरून हलला नव्हता. बुधवारी दुपारी सावंत याला एक लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर अचानकपणे सावंत याच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

लाच प्रकरणात अडकल्यानंतरही महत्त्वाची पदे

एखादा अधिकारी लाच प्रकरणात अडकल्यानंतर तो निलंबित होतो. मात्र काही ठरावीक कालावधीनंतर त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेतले जाते. अशावेळी सेवेत परत घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याला महत्त्वाची पदे देऊ नयेत, असा नियम आहे, परंतु मीरा-भाईंदर महापालिकेत लाचप्रकरणात अडकलेले प्रभाग अधिकारी पुन्हा महत्त्वाची पदे मिरवता दिसून येत आहे. याआधी प्रभाग अधिकारी या पदावर लाच स्वीकारताना अटक झालेले संजय दोंदे आता अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत झाले आहेत. प्रभाग अधिकारी सुनील यादव हेदेखील कामावर पुनश्च रुजू होऊन सध्या भाईंदर पूर्व येथे प्रभाग अधिकारी म्हणूनच काम करत आहेत.