मोठमोठय़ा स्पर्धाच्या सरावासाठी योग्य असलेल्या ‘ठाणे क्लब’मधील तरणतलावात पोहोण्यासाठी येणारे जलतरणपटूही ठेकेदाराच्या मनमानी शुल्क आकारणीतून वाचू शकले नाहीत. उलट अवाजवी शुल्क न दिल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून या जलतरणपटूंना ‘क्लब’ची दारे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे जलतरण स्पर्धेच्या शर्यतीसाठी सराव करण्याऐवजी या जलतरणपटूंना पालिका प्रशासनाकडे हेलपाटे घालावे लागत आहेत.  
ठाणे महानगरपालिकेचा ‘ठाणे क्लब’ येथील ऑलिम्पिक दर्जाचा एकमेव जलतरण तलाव चालू अवस्थेत आहे. त्यामुळे राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात सहभागी होणारे अनेक जलतरणपटू गेल्या पाच वर्षांपासून येथे सराव करतात. जुन्या नियमावलीप्रमाणे या जलतरणपटूंना केवळ ७ हजार पाचशे रुपयांचे शुल्क आकारले जात होते, मात्र नव्या व्यवस्थापनाने चक्क ८० हजारांची सदस्यत्वाची मागणी केल्यामुळे या जलतरणपटूंचा सरावच बंद पडला. नव्या व्यवस्थापनाने सदस्य नोंदणी नूतनीकरण
पूर्णपणे बंद करून टाकले तसेच २७
नोव्हेंबरनंतर तरणतलावात पोहण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला.
या प्रकारानंतर या जलतरणपटूंच्या पालकांनी महापालिका आयुक्तांकडे पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली. ठाणेच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव देशात उज्ज्वल करण्याची क्षमता असलेल्या या जलतरणपटूंना पाच वर्षांसाठी अडीच ते तीन लाख रुपयांचे शुल्क भरणे शक्य नसल्याने त्यांना पूर्वीच्याच दरांत सराव करता यावा, अशी मागणी पालकांनी केली होती. गेल्या चार महिन्यांपासून पालकांनी त्यासाठी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. मात्र पुढे काहीच चर्चा झाली नाही.
आयुक्तांच्या स्वीय साहाय्यकांनीही या प्रकरणी दोन दिवसांत मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र नंतर त्यांनी पालकांचे फोन घेणेही बंद केले, अशी माहिती काही पालकांनी दिली.  
संतप्त पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर या प्रकरणाची तक्रार केली होती. मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकरणी मदतीची अपेक्षा या पालकांना होती. मात्र ‘तुमचे पत्र आम्हाला प्राप्त झाले असून संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यात आले आहे’ या ठोकळेबाज उत्तरापलीकडे त्यांच्या हाती काहीच लागले नाही.  

एप्रिलमध्ये विभागीय जलतरण स्पर्धा
ठाणे जिल्हा जलतरण संघटनेच्या माध्यमातून हे जलतरणपटू पुढील स्पर्धेसाठी तयारी करीत असून एप्रिलमध्ये ठाणे विभागीय जलतरण स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सराव आवश्यक असून या तरणतलावाशिवाय दुसरा कोणताच पर्याय या विद्यार्थ्यांसमोर नाही. शिवाय काही विद्यार्थी नववी इयत्तेत असल्याने पुढील वर्षी दहावीमध्ये त्यांच्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे इथे प्रवेश नाकारल्यास अभ्यासाबरोबरच पोहण्याच्या तलावासाठी शोधाशोध करण्याची वेळ या जलतरणपटूंवर येऊ शकते, असे या मुलांच्या पालकांनी सांगितले.