शहरातील नागरिकांना पोहण्याचा सराव व्हावा, या करता तरण तलावांची निर्मिती पालिकेच्यावतीने करण्यात आली. परंतु सदरच्या तलावांची सध्या दुरवस्था झाली आहे. ठाण्यातील कळवा परिसरात असलेले यशवंत रामा साळवी तलाव तांत्रिक कारणामुळे गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. तलाव बंद असल्यामुळे या ठिकाणी नियमित येणाऱ्या सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय.

तलावात हिरव्या पाण्याचा तवंग दिसू लागला आहे. पालिकेने तलाच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान तलावाची अवस्था पुर्वत करण्यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, पालिका यासाठी किती वेळ घेणार हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने ठाण्यातील कळवा परिसरात २७ वर्षांपूर्वी यशवंत रामा साळवी तरण तलावाची निर्मित करण्यात आली होती. या तलावामध्ये दररोज पाचशेहून अधिक सदस्य सरावासाठी येत असतात. ठाण्यात पालिकेच्या हक्काची ५ तलाव आहेत. कळवा येथील या तलावाचे एकूण ३००० हजाराहून अधिक सदस्य असून त्या सदस्यांना पोहणं तर सोडाच परंतू नियमित पैसे भरून देखील पोहण्यास मिळत नाही. या तलावाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याची खंत पोहण्यासाठी येणाऱ्यांनी व्यक्त केली. तलावातील फिल्टरची साफ सफाई दीड वर्षापूर्वी करण्यात आली असून ९ ते १० वेळा हे तलाव बंद पडल्याचे जलतरणपटूंनी सांगितले. तरण तलावाच्या समस्येमुळे पैशांचे नुकसान होत असल्याची भावना देखील जलतरणपटूंनी व्यक्त केली.

कळवा येथील तरण तलावाचं पाणी सध्या त्याच्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्यामुळे  हिरव्या रंगाचं झालं आहे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या टाईल्स तर निकामी झाल्या आहेत. तर या ठिकाणची उपकरण देखील निकामी झाली असल्याचं येथील नागरिक सांगतात केवळ खाजगी संस्थांच्यावतीने या ठिकाणी पोहण्यासाठी परवानगी दिल्यामुळे नियमित पोहणाऱ्यांवर अन्याय होत आहे. तसेच या ठिकाणी फिल्टरेशन बंद असल्यामुळे त्या ठिकाणी पाणीच फिल्टर होत नाही. या ठिकाणी फिल्टर ऑपरेटर पाहिजे, अशी मागणी देखील नागरिक करत आहेत. या ठिकाणी नेहमीच अशा प्रकारचे प्रश्न उदभवत असल्याचं देखील नागरिकांनी सांगितले.

याबाबतीत स्थानिक नगरसेविका अपर्णा साळवी म्हणाल्या की, जलतरण तलावाला २७ वर्ष पूर्ण झाली असून त्याच्या नूतनीकारणासाठी पालिकेकडे आर्थिक संकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली होती. परंतू, दीड वर्ष होवून ही प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही.