शिवसेना नगरसेविकेचे अकलेचे तारेखास

उंदीर आणि घुशींच्या मलमूत्रामुळे स्वाइन फ्लू आजाराची लागण होत असल्याचा दावा करीत वागळे परिसरातील शिवसेनेच्या नगरसेविका शिल्पा वाघ यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थितांना चकित करून सोडले. शहरात उंदीर आणि घुशींची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू फोफावत असल्याचा त्यांचा दावा होता. वाघ यांच्या बोलण्यातील फोलपणा लक्षात येताच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना ‘लेप्टो’ असा इशारा करीत ‘सावध’ करण्याचाही प्रयत्न केला. तरीही नगरसेविका वाघ यांचे स्वाइन फ्लू आजाराबाबतच्या अज्ञानाचे पारायण सुरूच ठेवले.

ठाणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णाचा आकडा तीनशेच्या जवळपास पोहचला असून त्यात १४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. तसेच स्वाइन फ्लू आजाराची लागण झालेल्या रुग्णांना लवकर औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या. या चर्चेदरम्यान, शिवसेनेच्या नगरसेविका शिल्पा वाघ यांनी उंदीर आणि घुशींच्या मलमूत्रामुळे स्वाइन फ्लू आजाराची लागण होत असल्याचा दावा करताच उपस्थित आवाक झाले. त्याच वेळेस महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ‘लेप्टो’ असा इशारा करीत त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघबाईंचे उंदीरपुराण संपतच नव्हते. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. अखेर महापौरांच्या सूचनेनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वाइन फ्लू कशामुळे होतो, याचे छोटे व्याख्यानच सर्वपक्षीय सदस्यांना दिले.

यंदा झालेल्या महापालिका निवडणुकीत वागळे परिसरातून शिल्पा वाघ या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पती जितेंद्र वाघ हे डॉक्टर असून ते महापालिकेचे माजी नगरसेवक आणि आरोग्य सभापती होते.