बेकायदा बांधकामे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश

वर्षांनुवर्षे खाडीकिनारी उभ्या राहाणाऱ्या बेकायदा बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या ठाणे महापालिकेला उशिरा का होईना जाग आली असून येत्या पावसाळ्यानंतर शहराच्या विविध भागांत खाडीकिनारी उभ्या राहिलेल्या झोपडय़ा तसेच बांधकामांविरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. कळवा परिसरात सुरू असलेल्या कामांच्या पाहणीकरता ते गेले असता खाडीकिनारी जागोजागी अशी अतिक्रमणे उभी राहिल्याचे त्यांच्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले आहेत.

ठाणे, कळवा, मुंब्रा परिसराला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला असून त्याकडे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने वर्षांनुवर्षे दुर्लक्ष केले आहे. खाडीकिनारी असलेली खारफुटी कापून मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा आणि बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत अश्विनी जोशी यांच्या जिल्हाधिकारीपदाच्या कार्यकाळात त्यांनी खारफुटीची कत्तल रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा खाडीकिनारी बेकायदा बांधकामे उभी राहू लागली आहेत.

ठाणे महापालिकेत बडी पदे भूषविलेल्या काही नेत्यांनी कळवा खाडीकिनारी बेकायदा इमल्यांच्या रांगा उभ्या केल्या आहेत. त्याकडे तत्कालीन महापालिका आयुक्त आणि प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले. खाडीकिनारी तिवरांच्या झाडांची कत्तल करून झोपडय़ा उभारून विक्री करणारी एक मोठी टोळी आजही कार्यरत असून ठरावीक महापालिका अधिकारी, काही राजकीय नेते आणि स्थानिक गुंडांची एक मोठी साखळी या बेकायदा धंद्यामागे आहे हे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे.

पाहणी दौरा

ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविल्यानंतर अशाच कामांच्या पाहणीसाठी कळवा येथे गेलेले महापालिका आयुक्त जयस्वाल यांना खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणावर उभी राहिलेली बेकायदा बांधकामे दिसून आली. त्यानंतर त्यांनी पावसाळ्यानंतर तातडीने ही बांधकामे तसेच झोपडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले. जयस्वाल यांनी कळवा खाडीकिनारी असलेल्या शास्त्रीनगर, जानकीनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगरपासून ते साकेतपर्यंतचा परिसर पिंजून काढला. या भेटीदरम्यान त्यांनी कळवा चौक, कळवा स्टेशन रोड आणि बुधाजीनगर येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. बुधाजीनगर येथील रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत परिमंडळ-१ चे उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, शहर व  नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता अरविंद इताडकर, कार्यकारी अभियंता मनोज तायडे, साहाय्यक आयुक्त सागर घोलप आदी उपस्थित होते.