डोंबिवली ‘एमआयडीसी’ टप्पा एक मधील विकास, नवरंग परिसरातील सुमारे २५ ते ३० उद्योजकांचे दूरध्वनी, इंटरनेट सेवा गेल्या महिन्यापासून बंद आहेत. भारत संचार निगमच्या या दोन्ही सेवा ठप्प असल्याने उद्योजकांना तयार मालाचे विक्री व्यवहार करणे, आपल्या ग्राहकांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क करणे अवघड झाले आहे. ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांकडून ही सेवा सुरू करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याने उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.
कंपन्यांमधील बहुतांशी व्यवहार हे इंटरनेटच्या माध्यमातून होतात. ‘बीएसएनएल’ची ब्रॉडबॅन्ड सेवा वेगवान असल्याने बुहतेक उद्योजकांकडे ही सेवा आहे. महिनाभर ब्रॉन्डबॅन्ड सेवा बंद असल्याने उद्योजक हैराण झाले आहेत. कच्या मालाची मागणी करणे, तयार मालाची पाठवणी करणे, यंत्रसामुग्री मागवणे ही कामे अलिकडे इंटरनेटच्या माध्यमातून केली जातात. सेवा ठप्प असल्याने उद्योजकांची अडचण झाली आहे.
या विषयीच्या तक्रारी ३० उद्योजकांनी व्यक्तिश: ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. तेथील अधिकारी ‘ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत’ अशी उडवाउडवीची उत्तरे महिनाभर उद्योजकांना देत आहेत. अधिक माहितीसाठी ‘बीएसएनएल’चे अभियंता सरोदे यांच्याशी संपर्क केला. आपण घरगुती अडचणीत आहोत असे सांगून त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.