सदनिकांचा ताबा सोडण्यासाठी महिलांना मारहाण केल्याचा आरोप

सदनिकांचा ताबा सोडण्यासाठी महिलांना मारहाण केल्याप्रकरणी ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकासह नऊजणांविरु द्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. वडगाव शेरी भागात शनिवारी (२४ सप्टेंबर) दुपारी ही घटना घडली.

बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध अशोक कानकेकर (वय ३७, रा.श्री स्वामी समर्थ सोसायटी, लोकमान्यनगर, ठाणे), विक्रम दिनकर देशमुख (५४), उदय चंद्रकांत पैठणकर (४७), अनिल गुणाजी भोसले (३८), योगेश सुरेश घंगाळे (३८), सुरेश रघुनाथ घंगाळे (६२), सचिन रवींद्र अपसंगेकर (३१), रफीक रुस्तम शेख (३५), रमेश किसन वाघमारे (५२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुभद्रा गलांडे (वय ५०, रा. वडगाव शेरी) यांनी या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रूडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीतील मोझेसवाडी भागात गलांडे यांची जागा आहे. २०१० मध्ये गलांडे यांची जागा विकसित करण्यासाठी गलांडे आणि योगेश कन्स्ट्रक्शन फर्म यांच्यात करार झाला होता. गलांडे यांना १६ सदनिका देण्याचे करारात मान्य करण्यात आले होते. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक कानकेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वीस सदनिका अन्य ग्राहकांना विकल्या. तेथे एकाच इमारतीचे काम पूर्ण झाले होते. उर्वरित इमारतींचे काम थांबले होते. गलांडे कुटुंबीयांक डे १६ सदनिकांचा ताबा आहे. त्यामुळे अन्य ग्राहकांना ताबा देण्यास कानकेकरला अडचण आली होती. शनिवारी दुपारी ग्राहक तेथे आले होते. त्यानंतर कानकेकर आणि त्याच्या साथीदारांनी वादावादी सुरू केली. गलांडे यांना सदनिकेतून हुसकावण्यात आले. झटापटीत गलांडे यांच्या पुतणीचे मंगळसूत्र गहाळ झाले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून बांधकाम व्यावसायिकासह नऊजणांना अटक केली. पोलीस निरीक्षक पाथ्रूडकर तपास करत आहेत.