ठाणे शहरातील नौपाडा भागात सोमवारी रात्री झालेल्या इमारत दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. या दुर्घटनेचे साक्षीदार आणि इमारतीतील रहिवाशी अमृत लाल यांच्यासोबत हृद्यद्रावक प्रसंग घडला. इमारत कोसळली तेव्हा अमृत लाल देखील ढिगाऱयाखाली अडकले होते. मात्र, त्यातून कसेबसे बाहेर येण्यात त्यांना यश आले. अमृत लाल हे चहाचे दुकानदार असून दुकानात काम करणाऱया शंकर मिना, मोहन मिना आणि रमेश मिना या तीन कामगारांसोबत आणखी एकाला ढिगाऱयाखालून सुखरूप बाहेर काढण्यात लाल यांना यश आले. त्यानंतर पत्नी आणि मुलीच्या दिशेने अमृत लाल यांनी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्यांनी आपल्या पत्नीला ढिगाऱयाखालून बाहेर काढले. पण प्रिया(१२) या आपल्या मुलीला वाचवण्यासाठी गेले असताना अमृत लाल त्यांच्या डोक्यावर इमारतीचा एक भाग कोसळला आणि प्रियाचा हात त्यांच्या हातातून निसटला. तेव्हा ते प्रियाबरोबर पुन्हा एकदा ढिगाऱयाखाली गाडले गेले. त्यानंतर बचाव पथकाने अमृत लाल यांना सुखरूप बाहेर काढले पण बचाव पथक मदतीसाठी पोहोचण्याआधीच प्रियाचा ढिगाऱयाखाली गुदमरून मृत्यू झाला होता. दरम्यान, अमृत लाल यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तर पत्नी दुर्घटनेच्या धक्क्यात आहे.