ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय जिल्ह्य़ाच्या विविध भागातून येणाऱ्या रुग्णांनी सतत गजबजलेले असले तरी मंगळवारी दिवसभर येथे कृष्णा निवास इमारत दुर्घटनेतील रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात येणाऱ्या प्रत्येक जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. सकाळी या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांचा रुग्णालयाला गराडा पडला होता. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने निर्माण होणारे हुंदके आणि अश्रूंच्या धारांनी रुग्णालय परिसरातील उपस्थित सुन्न झाले होते. रुग्णालयात दाखल झालेल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना इमारतीच्या बाहेर लावलेल्या फलकावर मृत आणि जखमींची नावे कळवण्याची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाने केली होती. मृतांचे नातेवाईक, शेजारी आणि मित्रमंडळींना रुग्णालयातील शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात येत होते.
कृष्णा निवास इमारत दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी काही जण या धक्क्य़ातून सावरू शकले नसल्याने त्यांना कोणालाही भेटू देण्यात येत नव्हते. जखमींकडून सतत आपल्या कुटुंबाची विचारपूस केली जात होती. कुटुंबातील एकटेच वाचलेल्या अमित खोत यांना त्यांच्या परिवारातील मृतांची माहिती दिली गेली नव्हती. मात्र, कुटुंबीय आणि नातेवाईक आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना याची कल्पना दिली.
मृतदेह नेणार कुठे?
दुर्घटनेतील मृत अरुण सावंत आयुर्विमा महामंडळातील निवृत्त कर्मचारी असल्याने कार्यालयातील मित्रमंडळींनी रुग्णालयात गर्दी केली होती. सावंत यांचा मुलगा, मुलगी आणि नात या अपघातात मृत्युमुखी पडल्याने आणि घर उद्ध्वस्त झाल्याने त्यांचा मृतदेह नेणार कुठे असा प्रश्न त्यांच्या मित्र मंडळींना पडला होता. सावंत यांचा मुलगा अमित ठाण्यातील ए. के. जोशी शाळेत आणि नंतर बेडेकर महाविद्यालयात शिकलेला असल्याने त्याचा मित्र परिवार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अमितच्या अकाली जाण्याने मित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात होती. सावंत यांचे लोढा संकुलात घर असले तरी तेथे आता कोणीच नसल्याने जाणार कुठे असा प्रश्न यावेळी व्यक्त होत होता. भट कुटुंबातील कोणीही वाचले नसले तरी त्यांचे अन्य नातेवाईक रुग्णालय परिसरात दाखल झाले होते. घर राहिले नसल्याने मृतदेह कुठे न्यायचा हा प्रश्न त्यांनाही भेडसावत होता.
मृत व जखमींची नावे..
मृत..
सुबराव भट (५४), रामचंद्र भट (५०)मिरा भट (५०), रूचिता भट (२५)अरूण सावंत (६२), अमित सावंत (४०), भक्ती खोत (२४), अनया खोत (५), प्रिया पटेल (१४), रश्मी मांगे (२५), मंदा नेने (७०), माधव रामचंद्र बर्वे (६०)

जखमी..
अरविंद नेने (८०)अमित खोत (३१)रमेश मेधा (२०)आशा पटेल (३०)मोहन नेओजी (२६)शंकर भेडा (४०)अमृतलाल पटेल (३५)

 

‘तातडीने आराखडा सादर करा’
ठाणे : ठाणे जिल्हय़ातील महापालिका आणि नगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती पाडून, त्यातील नागरिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनाचा आकस्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देश ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. हा आराखडा एक दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी जोशी यांनी दिले आहेत.
ठाकुर्ली येथील इमारत दुर्घटना व त्यानंतर मंगळवारी सकाळी घडलेल्या ठाण्यातील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाणे जिल्हय़ातील महानगरपालिका आणि नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते. अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यातील रहिवाशांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात यावी व त्या इमारती पाडण्यात याव्यात, असे त्यांनी या वेळी सांगितले. या संदर्भातील आकस्मिक आराखडा तयार करून एका दिवसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.