तळीरामांची खोड मोडण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचा उपक्रम; एप्रिल-मेची यादी संकेतस्थळावरून प्रसिद्ध
मद्यपी चालकांकडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि मद्याच्या नशेत वाहन चालविण्याच्या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी आता अशा चालकांचे आपल्या संकेतस्थळावरून जाहीर वाभाडे काढण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे ते बदलापूर या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सापडलेल्या मद्यपी चालकांची यादीच ठाणे पोलिसांच्या संकेतस्थळावर टाकली जाऊ लागली आहे. या यादीत चालकांच्या नावासह त्याने किती मद्य प्राशन केले होते, याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईत सापडलेल्या मद्यपी चालकाची सविस्तर माहिती वाहतूक पोलिसांकडून संगणकावर नोंदविली जात आहे. त्यामध्ये वाहतुक शाखेच्या युनिटचे नाव, मद्यपी चालकाचे नाव आणि पत्ता, त्याचे वय, गाडीचा क्रमांक, वाहन परवाना क्रमांक, गाडीचा प्रकार, कारवाईची तारीख आणि वेळ, त्याच्या शरीरात तपासणीदरम्यान आढळलेले मद्याचे प्रमाण या माहितीचा समावेश असतो. या माहितीच्या आधारे सातत्याने मद्याच्या नशेत वाहन चालविताना आढळणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येते. शहरातील मद्यपी चालकांना वचक बसवा म्हणून याच माहितीचा वापर करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयानुसार ठाणे पोलिसांच्या संकेतस्थळावर मद्यपी चालकांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
एप्रिल आणि मार्च महिन्यांतील कारवाईची यादी संकेतस्थळावर प्रसिद्घ करण्यात आली आहे. या संदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता, मद्याच्या नशेत वाहन चालविण्याच्या प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी अशा चालकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुधारण्याची आशा
मद्याच्या नशेत वाहन चालविणारे चालक वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सापडले तर अशा चालकांची मद्याची नशाच उतरते. तसेच या कारवाईमुळे नातेवाईक आणि समाजात बदनामी होऊ शकते, या भीतीने अनेक चालक कारवाईतून स्वत:ची सुटका करण्यासाठी हालचाली करतात. कारागृहाची हवा खावी लागू नये म्हणून अनेक चालक दंडाची रीतसर रक्कम भरण्यास तयार होतात. तसेच काही चालक कारवाईत पकडल्यानंतर घरच्यांना कळवू नका, असे वाहतूक पोलिसांना सांगतात. त्यामुळे आता संकेतस्थळावर नावे येण्याच्या भीतीने तळीराम सुधरतील, अशी पोलिसांना आशा आहे.