अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्याकडून कौतुक
ठाणे शहरांने यजमानपद स्वीकारलेले ९६ वे अखिल भारतीय नाटय़संमेलन राजेशाही थाटात पारपडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आणि त्यापूर्वीही ठाणेकरांनी माझा यथोचित सन्मान केला. ठाण्यातील दिवा परिसरातून माझ्या लेखणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याच शहराने केलेला हा सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. ठाणे हे नाटय़ संमेलनाध्यक्षांचे सर्वाधिक सन्मान करणारे शहर ठरले आहे, असे कौतुक ९६ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी रविवारी गडकरी रंगायतन येथे व्यक्त केले.
ठाण्यातील ज्ञानदीप कलामंचतर्फे गंगाराम गवाणकर यांच्या एकांकिकांचा महोत्सव आणि शिबिरार्थीचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. लेखक व तहसीलदार डॉ. संदीप माने, लेखक व्यंकट पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ वर्तक, ज्ञानदीप कलामंचचे संचालक राजेश राणे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य बालनाटय़ स्पर्धेत ‘डरांव डरांव’ या बालनाटय़ाने प्रथम पारितोषिकांसह एकूण ११ पारितोषिके पटकाविली, या बालनाटय़ातील बालकलाकारांना ज्ञानदीप कलामंचने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. तसेच ज्ञानदीप कलामंचाच्या विलेपार्ले शाखेतील शिबिरार्थीनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नाटयसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या ‘बळी आणि विठ्ठल विठ्ठल’ या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी ज्ञानदीप कलामंचच्या अर्पिता जोशी, अनुष्का आंबवणे, वेदांगी आठवले, वेदश्री तांबोळी यांनी गणेशवंदना सादर केली. तसेच ग्रीष्मा पवार हिने सादरीकरण केले, तर सई डिंगणकर हिने ‘फुलराणी’ मधील तुला शिकवीन चांगलाच धडा हे स्वगत सादर केले. अभिनयाच्या व्यतिरिक्त मुलांमध्ये असलेली कलागुण सादर करण्याची संधी या वेळी मुलांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता जोशी, मृणाल जोशी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नजा मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.