मौजमजा करण्यासाठी चाकूचा धाक दाखवून कॅब, ओला टॅक्सीचालकांना लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला कापुरबावडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये दोन महाविद्यालयीन तरुण असून अन्य दोघे सराईत गुन्हेगार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ही टोळी रात्रीच्या वेळी प्रवासी भाडे घेऊन आलेल्या कॅबचालकांना निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवून लुटायचे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने त्या रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले आणि लुटारू टोळीचा पर्दाफाश करण्यात यशस्वी झाले.

या टोळीने आतापर्यंत अनेक टॅक्सीचालकांना लुटले आहे. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल, घड्याळ आदी किंमती वस्तू घेऊन ते पसार व्हायचे. परंतु मोठा डल्ला मारण्याच्या उद्देशाने त्यांनी कार पळवण्याचा कट रचला. त्यानुसार चालक विमालेश गुप्ता याच्या कॅबमध्ये ते बसले. नाशिक रोडवर अज्ञातस्थळी गाडी थांबवली. त्याच्या डोक्यावर चाकूने वार केला. यात मृत्यू झाल्याचे समजून त्याला तेथेच फेकून दिले आणि पसार झाले. शिर्डीला पायी जात असलेल्या साईभक्तांनी जखमी अवस्थेत गुप्ता याला पाहिले. पोलिसांच्या मदतीने त्यांनी गुप्ताला रुग्णालयात दाखल केले. आपल्यावर ओढवलेला प्रसंग त्याने पोलिसांना सांगितला. त्याने आरोपींचे वर्णनही केले. त्यावरून चौघांचा शोध सुरू झाला. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. यातील दोन जण सराईत गुन्हेगार आहेत. तर दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यातील मुख्य आरोपी अक्षय उगवेकर हा अकोल्याचा आहे. अक्षयवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. चौकशीत त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाने या चौघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.