आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात मुलांनी नेमके कोणत्या क्षेत्रात करिअर करावे आणि पालक आणि विद्यार्थी यांचा ताणतणाव कसा कमी करावा यासाठी ठाण्यातील एनकेटीटी महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन, प्लेसमेंट सेल या विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थापक मंगेश बोरकर यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास तसेच बाह्य़ गुणात्मक परीक्षा यांतील महत्त्व पटवून दिले. त्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मुलांनी कसा करावा याचे अनमोल मार्गदर्शन त्यांनी दिले.  माजी विद्यार्थी योगेश देशमुख यांनी कॉलेजच्या आणि स्वत:च्या आयुष्यातल्या खडतर प्रवासाच्या आठवणी सांगितल्या, कठीण प्रवास कसा सोपा करता येतो याचे मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अभय सावंत यांनी कॉलेजच्या आठवणी विद्याथ्यार्र्शी मनमोकळेपणाने संवाद साधून प्रोत्साहित केले. प्राचार्य डॉ. पी. एम. कारखेले यांच्या मार्गदर्शना नुसार एकदिवसीय, नागरी सेवा संधी व राज्यसेवा आयोग आणि केंद्र सेवा आयोग (एमपीएससी व  यूपीएससी) स्पर्धा परीक्षा तयारी आणि विषयावर व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. कुलकर्णी तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रा. एन. एन. वराडे, उपाध्यक्ष प्रा. डी. बी. मुलमुले, प्रा. कुमारमंगलम आणि आर. बी. लुळे उपस्थित होते .

या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी तसेच ठाणे येथील प्रसिद्ध संबोधी करिअर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक उपस्थित होते. महाविद्यालयातील  १००हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या शेवटी मानपत्र देऊन सत्कार केला.

केवळ सुशिक्षित होऊ नका तर साक्षर व्हा

अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

प्रतिनिधी, ठाणे

विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास करून सुशिक्षित होऊ नका तर साक्षर व्हा. केलेल्या अभ्यासाचा उपयोग आपल्या देशासाठी कसा होईल याचा सर्वानी विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी केले. ते ठाण्यातील एमकॉस्ट महाविद्यालय आयोजित विद्यार्थी मेळाव्यामध्ये बोलत होते. एमकॉस्ट महाविद्यालयातर्फे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आणि शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.

नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तरुणांनी करण्याची गरज आहे. आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी केले.

नवे तंत्रज्ञान हे मिठासारखे असून त्याचा आवश्यकतेनुसार उपयोग केला तरच त्याचा खरा आनंद घेता येऊ  शकेल. मात्र त्याचा अतिरेक केल्यास आयुष्य बेचव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांवरील संकेतस्थळावर वेळ घालण्याऐवजी तो वेळ चांगल्या कामासाठी लावणे आवश्यक आहे, असेही ते म्हाणाले

या वेळी हबिब एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. शोएब खान, श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक कारकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षां परब, डॉ. इर्शाद काझी, डॉ. जे. एन. शाह, रमेश महाडिक आदी मान्यवर मंडळी व शिक्षक वर्ग या वेळी उपस्थित होते.

जोशी-बेडेकर महाविद्यालयात प्राध्यापिकांचा जागर

प्रज्ञा पोवळे, युवा वार्ताहर

जोशी-बेडेकर महाविद्यलयाच्या महिला विकास कक्षातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून कर्तत्ववान महिलांना सलाम करण्यात आला. या वेळी वेदकाळातील राणी विश्वला, गार्गी, मैत्रेयी यांसारख्या विदुषी ते भारतीय संत परंपरेतील आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महिलांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

राणी लक्ष्मीबाईसोबत उभी राहणारी ज्युलेखा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हिंदू लेडी रखमाबाई, अरुणा असफ अली, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कर्तृत्व गाजवलेल्या अनेक स्त्रिया, मेधा पाटकर, ‘मुलगी झाली हो’ नाटकाच्या ‘लेखिका ज्योती म्हापसेकर’, मृणाल गोऱ्हे, रझिया पटेल, पहिले दलित स्त्री आत्मकथन लिहिणाऱ्या शांताबाई कांबळे, कॅन्सरशी झुंज देत मुक्तांगण चालविणाऱ्या डॉ. सुनंदा अवचट अशा विविध महिलांच्या कार्याची महती प्राध्यापकांनी आपल्या सादरीकरणातून सांगितली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. प्रज्ञा राजेबहाद्दूर, प्रा. गीतांजली चिपळूणकर, प्रा. डॉ. सुजा रॉय अब्राहम, प्रा. विमुक्ता राजे, प्रा. अर्चना प्रभुदेसाई, प्रा. क्रांती डोईबळे, प्रा. आभा पांडे, प्रा. रुचिता गावडे, प्रा. अर्चना डोईफोडे, प्रा. वेदवती परांजपे, प्रा. स्वाती भालेराव आणि प्रा. पूजा मुळे-देशपांडे या प्राध्यापिकांनी सहभाग घेतला होता.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांना आयकॉन फाऊंडेशनचा ‘महाराष्ट्र कन्या’ हा पुरस्कार प्राप्त झाला. यासाठी  महाविद्यालयातर्फे आणि माजी विद्यार्थी सर्ज संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बोलताना प्राचार्या डॉ. शकुंतला ए. सिंग यांनी  स्त्रियांची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने यांचा अभ्यास केला पाहिजे, आजच्या स्त्रीने अधिक सक्षम होण्याची गरज आहे परंतु तिची सक्षमता ही माणुसकी आणि  विनयासोबतच आली पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला.