आजची सशक्त स्त्री वयाच्या विविध टप्प्यांवर अनुभवातून शिकत मोठी होत असते. समाजातील कर्तृत्ववान महिलांना त्यांचे अनुभव, शैक्षणिक वयात मिळालेल्या संधी, महाविद्यालयीन वर्षांत मिळालेली बक्षिसे आणि आत्मविश्वास मोठे करत असतात. भविष्यात एखाद्या क्षेत्रात कर्तृत्ववान होणाऱ्या महिलांचे प्रतिबिंब महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींमध्ये दिसते. अभ्यासासोबतच विशिष्ट अशा कलागुणांमुळे या विद्यार्थिनी महाविद्यालयाचे नाव मोठे करणाऱ्या तारका ठरतात. महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी विद्यार्थिनींनी आपापल्या क्षेत्रात भरारी घेतली तरी प्राध्यापकांना कायम या विद्यार्थिनींचे कौतुक असते. महाविद्यालयाच्या स्मरणिकेत या विद्यार्थिनींचे नाव कोरले जाते. विविध क्षेत्रांत महाविद्यालयीन पातळीवर आपले नैपुण्य सिद्ध करणाऱ्या काही महाविद्यालयांतील विद्यार्थिनींचा घेतलेला वेध.

जोशी-बेडेकरच्या हर्षदा सोनावणेला राज्यस्तरीय सामाजिक बांधिलकी पुरस्कार

जोशी-बेडेकर महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेत दाखल झालेल्या हर्षदा सोनावणे या विद्यार्थिनीला अनुताई वाघ सामाजिक बांधिलकी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हर्षदाचा सन्मान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारातून मिळालेला निधी हर्षदाने ‘नाम’ संस्थेच्या कार्यासाठी सुपूर्द केला आहे. महाविद्यालयीन वयात तरुणांचा कल विविध स्पर्धामध्ये पारितोषिके मिळविण्याचा असतो. हर्षदाने सुद्धा अनेक पारितोषिके मिळवली मात्र ही पारितोषिके नृत्यासाठी नाही किंवा अभिनयासाठी नाही. शिक्षण घेत असतानाच समाजाप्रती असणाऱ्या बांधिलकीविषयी हर्षदाने अनेक ठिकाणी सामाजिक कार्य केले. या कार्याचा गौरव म्हणून महाविद्यालयातर्फे हर्षदाचा विविध पारितोषिकांनी गौरव केला आहे. वृक्ष लागवड, स्वच्छता, इच वन टीच वन, रक्तदान शिबीर अशा उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असतो. हर्षदा अनेकदा अंध परीक्षार्थीना लिपिक म्हणून सहकार्य करते. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंतर्गत गरजू व्यक्तीला दीड लाखाची मदत हर्षदाने उपलब्ध करून दिली आहे. राज्यस्तरावरील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या शिबिरासाठी हर्षदाची निवड करण्यात आली होती. या कामाची दखल घेत आपले सामाजिक भान कायम जागृत ठेवून समाजशील कर्तृत्व घडत राहावे यासाठी हर्षदाला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्टार स्वयंसेवक, महाविद्यालय आणि सर्ज संस्थेमार्फत उत्कृष्ट स्वयंसेवक अशा पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. सध्या हर्षदा पदवीच्या शेवटच्या वर्षांला शिकत असून भविष्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याची तिची इच्छा आहे. तरुण वयात मिळालेल्या सामाजिक पुरस्कारामुळे जोशी-बेडेकर महाविद्यालयातील इतर तरुणांपुढे हर्षदा आदर्श ठरली आहे.

आदर्श महाविद्यालयाची मिस आदर्शक्षितिजा

नृत्य आणि संगीत बहुसंख्य प्रेक्षकांसमोर निर्भीडपणे सादर करायचे असल्यास शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. प्रशिक्षणाअभावी नृत्यातील बारकावे आणि गाण्यातील सूर अचूक सादर केले जातील का अशी शंका सादरकर्त्यांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. आदर्श महाविद्यालयाची क्षितिजा घाणेकर ही विद्यार्थिनी मात्र नृत्य आणि संगीताचे कोणतेही प्रशिक्षण न घेता आत्मविश्वासाने स्पर्धामध्ये सहभागी होते. केवळ स्पर्धामध्ये सहभागी न होता या स्पर्धामध्ये विशेष नैपुण्य मिळवत क्षितिजाने अनेक पारितोषिकांवर आपले नाव कोरले आहे. क्षितिजाला संगीत आणि नृत्याची आवड असल्याने अनेक स्पर्धामध्ये तिचा सहभाग असतो. आसाम कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत क्षितिजाने प्रथम पारितोषिक मिळवले. महाविद्यालयाच्या प्रगतीत क्षितिजाने मिळवलेल्या या पारितोषिकाचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धामध्ये तिने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. या व्यतिरिक्त क्षितिजाने आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने रोट्रॅक क्लब ऑफ आदर्श महाविद्यालयाच्या अंतर्गत वांगणी येथील कुडेराम गावात ग्रंथालय सुरू केले असून ७०० पुस्तके भेट दिली आहेत. वूमन डेव्हलपमेंट सेलच्या उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असतो. आदिवासी मुलांसाठी दर शनिवार आणि रविवारी क्षितिजा आणि तिचा मित्रपरिवार व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग घेतात. महाविद्यालयाची सांस्कृतिक विद्यार्थी प्रमुख ही जबाबदारी क्षितिजा सांभाळते. विविध क्षेत्रांतील क्षितिजाच्या नैपुण्यासाठी तिला आदर्श महाविद्यालयाचा मिस आदर्श पुरस्कार देण्यात आला आहे. महिला दिनानिमित्ताने क्षितिजाचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला आहे.

महाविद्यालयातूनच व्यवस्थापन कौशल्याची चुणूक

महाविद्यालय हे एक प्रकारचे विद्यार्थ्यांना सर्वाथाने घडवणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना पैलू पाडून त्यांच्या भावी आयुष्याला एक भक्कम पाश्र्वभूमी देण्याचे कार्य महाविद्यालये वर्षांनुवर्षे करत आहेत. महाविद्यालयामधील विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयुष्याला एक योग्य दिशा मिळवलेली विद्यार्थिनी म्हणजेच एनकेटीटी महाविद्यालयाची नमिता भत्रा. आपल्या महाविद्यालयाच्या कार्यात आपला ही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने महाविद्यालयाच्या सर्वच उपक्रमांच्या व्यवस्थापनामध्ये नित्याने तिने सहभाग घेतला. केवळ सहभागीच झाली नाही तर, तो उपक्रम किंवा कार्यक्रम आपल्या व्यवस्थापकीय गुणांच्या आधारे यशस्वी करून दाखविला. यंदा मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या ठाणे जिल्ह्य़ाची विभागीय फेरीचे आयोजन येथील एनकेटीटी महाविद्यालयाला सुपूर्द करण्यात आले होते. त्या वेळी नमिताकडे आदरातिथ्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या वेळी केलेल्या तिच्या उत्कृष्ट  कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वार्षिक सोहळ्यामध्ये सवरेत्कृष्ट  व्यवस्थापकाचा पुरस्कार तिला मिळाला. तसेच तिच्या शैक्षणिक कारकीर्दीमध्ये अनेक उपक्रमांना यशस्वी करण्यात तिचा मोलाचा वाटा आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिली. एनकेटीटी महाविद्यालयाकडून मोठमोठे कार्यक्रमांचे नियोजन करण्याची संधी मिळाली. याचा फायदा माझ्या पुढील वाटचालीसाठी नक्की होईल, असा विश्वास तिने बोलताना व्यक्त केला.

रंगभूमीवर रमणारी ज्ञानसाधनाची पूजा

कोणतीही व्यक्ती लहानपणापासूनच आजूबाजूच्या गोष्टींचे अनुकरण करत असतो. कित्येक लहान मुलांच्या मनावर चित्रपट, नाटक, मालिकांचा पगडा असतो.   ज्ञानसाधना महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूजा कांबळे ही विद्यार्थिनीसुद्धा अशीच नाटकांची आवड असलेली. लहानपणापासूनच पूजाने रंगभूमीवरच काम करायचे मनाशी घट्ट केले. परंतु या क्षेत्रात काम करण्यासाठी योग्य मार्गदशानाची गरज होती, ते मार्गदर्शन ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या नाटय़परिवाराच्या माध्यमातून तिला मिळाले. सुरुवातीला आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये पूजाला ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस हफ्ता’ या एकांकिकेमध्ये ऑफिस गर्लचा अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण म्हणजेच ‘अशील’ ही एकांकिका. या एकांकिकेमध्ये एका वेश्येच्या जीवनावर भाष्य करणाची संधी तिला मिळाली. त्यासाठी अत्यंत चिकाटीने मेहनत  करत मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पूजाने पटकावला. याच महोत्सवामध्ये ‘अशील’ या एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळवून दिले. या यशाने भारावून न जाता आयएनटीसाठी पुन्हा नव्या जोमाने ‘मित्तर’ एक आगळीवेगळी एकांकिका करण्याच्या योग आला. या एकांकिकेमध्ये पूजाला नक्षलवादी महिलेची भूमिका साकारता आली. त्यांच्या जीवनाचा संपूर्ण अभ्यास करून हुबेहूब दिसणे, तंतोतंत बोलणे तिने आत्मसाद करून ‘ती’ भूमिका सादर केली. आजवर ‘मित्तर’ या एकांकिकेने १५ विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता त्यापैकी ७-८ स्पर्धामध्ये पूजाने या एकांकिकेच्या माध्यमातून पारितोषिके मिळवली. ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून मिळालेल्या या कलेच्या शिदोरीचा वापर भविष्यात रंगभूमीसाठी करणे, असे पूजा कांबळे हिने बोलताना सांगितले.

एकांकिका स्पर्धावर चैतालीची छाप

विज्ञान शाखेचा सूक्ष्मजीवशास्त्रासारखा अभ्यासक्रम, त्यासाठीची प्रात्यक्षिके यामधून स्वत:ची आवड जोपासणे म्हणजे कठीणच. मात्र सीएचएम महाविद्यालयाच्या चैताली मोरे या विद्यार्थिनीने अभ्यास आणि एकांकिका यांचा योग्य समन्वय साधत आपली आवड जोपासली आहे. केवळ आवड जोपासणे हे तिच्यासमोर उद्दिष्ट नव्हते तर आपल्या कलेचा महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी उपयोग तिने केला. एकांकिकेसाठी अनेक ठिकाणी सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवत चैतालीने सीएचएम महाविद्यालयाचे नाव मोठे केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सवरेत्कृष्ट अभिनेत्री, दापोली येथे झालेल्या राज्यस्तरीय पाजपंढरी एकांकिका स्पर्धा, रिक्त क्रिएशन्स राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यात सवरेत्कृष्ट अभिनेत्री अशी अनेक पारितोषिके चैतालीने मिळवली. पथनाटय़ सादर करणे, हिंदी-मराठी स्कीट करणे यात चैतालीचा सहभाग असतो.ह्ण

स्टुडंट ऑफ दी ईअरअनिका सय्यद

महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना केवळ अभ्यास हे एकमेव ध्येय लक्षात घेतले जाते. परंतु अभ्यास करताना महाविद्यालयातील इतर उपक्रमांमध्ये सहभागी होणे तितकेच महत्त्वाचे असते. अभ्यास आणि इतर गोष्टींचा समन्वय साधून एनकेटीटी महाविद्यालयाची ‘स्टुडेन्ट ऑफ दी ईअर’ ठरली अनिका सय्यद. एनकेटीटी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना काही पदव्या दिल्या जातात. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यांला आपण खरंच या पदवीसाठी पात्र आहोत याची खात्री होते. त्या वेळी त्यांच्यासाठी एका चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात येते व काही शिक्षकांची समिती त्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेते व त्यानंतर विविध पदव्या त्यांना दिल्या जातात. याच चाचणीमधून यशस्वी होत अनिकाने या महाविद्यालयाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षांची सवरेत्कृष्ट विद्यार्थिनी आहे हे दाखवून दिले. सतत कोणत्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेणे, कार्यक्रमांचे नियोजन करणे, स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळवणे यांसारख्या विविध गोष्टींमधून स्वत:ला तिने सिद्ध केले. एवढेच नाही तर अभ्यासक्रमातही उत्कृष्ट कामगिरी करून आपण सर्वार्थाने या पदवीसाठी परिपूर्ण आहोत हे दाखवून दिले. त्यामुळे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांचा ‘स्टुडेन्ट ऑफ दी ईअर’ हा पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.