काँग्रेस-राष्ट्रवादीचा महापौरांना घेराव; घोषणाबाजीत सभा तहकूब

ठाणे महापालिका परिवहन सेवेमार्फत कंत्राटी पद्घतीने चालविण्यात येणाऱ्या बसेसच्या ठेक्यामध्ये कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या मुद्दय़ावरून आक्रमक झालेल्या दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी व्यासपीठावर जाऊन महापौर संजय मोरे यांना घेराव घातल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर महापौरांनी सर्वच विषयांना मंजुरी देऊन सभा गुंम्डाळली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांचा सभागृहाबाहेर पडण्याचा मार्ग अडविला, ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात जेएनएनयूआरएम योजनेंर्गत १९० बस दाखल होणार आहेत. मात्र, भाजप सरकारने या योजनेतील बसगाडय़ांच्या मॉडेलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे परिवहन सेवेला बसखरेदीत साडेतीन कोटींचा भरुदड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या वाढीव खर्चाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला होता. या प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान ठाणे महापालिका परिवहन सेवेमार्फत जीसीसी कंत्राट पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या बसेसच्या ठेक्यामध्ये कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. त्यावर परिवहन  व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. तरीही दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. अखेर या मुद्दय़ावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. मात्र, परिवहन व्यवस्थापकांनी स्पष्टीकरण दिले असल्यामुळे महापौर संजय मोरे यांनी चर्चा थांबवून विषयपत्रिकेला सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी व्यासपीठावर जाऊन महापौरांना घेराव घातला. त्यानंतर महापौरांच्या मदतीसाठी शिवसेनेचे  नगरसेवक व्यासपीठावर धावले. तसेच सचिव मनीष जोशी यांनी विषय पत्रिकेचे वाचन करण्याचा प्रयत्न केला असता, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी त्यांच्या हातातील पत्रिका खेचण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा माईकही खेचून घेतला. अखेर महापौरांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाच मिनिटे चर्चा करण्याची मुभा दिली असता, शिवसेनेच्या नगरसेवकांनी याविषयी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने महापौरांनी सर्वच प्रस्तावांना मान्यता देऊन सभा गुंडाळली. दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक पुन्हा व्यासपीठावर आले असता महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करून सभा समाप्त केली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांचा सभागृहाबाहेर पडण्याचा मार्ग अडविला. काही वेळानंतर यातून महापौरांची सुटका झाली. मात्र, विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती.

ठाणे महापालिका परिवहन सेवेमार्फत कंत्राट पद्घतीने बसेस चालविण्यात येणार आहेत. मात्र, या ठेकेदाराला नवी मुंबई महापालिकेच्या तुलनेत जास्त दराने ठेका देण्यात आला आहे. तसेच नवी मुंबईच्या तुलनेत कमी अनामत रक्कम घेऊन दहा वर्षांसाठी ठेका दिला आहे. त्यामुळे या ठेक्यामध्ये कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाला आहे.

– संजय भोईर, विरोधी पक्षनेते.

नवी मुंबई परिवहन सेवेने मे २०१६ मध्ये यासंबंधी कामाचा आदेश काढला आहे तर ठाणे परिवहन सेवेने २९ जुलैला कामाचा आदेश काढला आहे. या दोन महिन्यांत नवी मुंबईतील ठेक्याची माहिती घेऊन ठाणे परिवहनला त्यात बदल करणे शक्य होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी सखोल चौकशी केली पाहिजे.

– नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे नगरसेवक

ठाणे महापालिका परिवहन सेवेमार्फत कंत्राट पद्घतीने बसेस चालविण्याचा प्रस्ताव गेल्यावर्षी मंजूर झाला असून भ्रष्टाचाराचे आरोप करणारे विरोधक वर्षभर गप्प का होते? याप्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. तसेच विरोधकांना चर्चा करण्यास मुभा दिली आणि त्यावर प्रशासनाने स्पष्टीकरणही दिले. मात्र, तरीही विरोधकांचे समाधान होत नव्हते.

– संजय मोरे, महापौर