ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कॉसमॉस बांधकाम कंपनीचे मालक सूरज परमार यांनी बुधवारी स्वतवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. परमार यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. परमार महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे (एमसीएचआय)  अध्यक्षही होते.

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली  आदी भागांत मोठमोठे बांधकाम प्रकल्प असलेल्या कॉसमॉस बांधकाम कंपनीचे मालक सूरज परमार बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घोडबंदर येथील त्यांच्या कार्यालयात आले. या ठिकाणी कॉसमॉस समूहाच्या रो-हाऊस प्रकल्पाचे काम  सुरू आहे. परमार यांनी कार्यालयात आल्यानंतर काही वेळातच स्वतच्या केबिनमध्ये रिव्हॉल्व्हरमधून स्वतवर गोळ्या झाडू घेतल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून परमार यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या बंगल्यातील कर्मचारी तातडीने त्यांच्या केबिनकडे धावले. मात्र, तोपर्यंत परमार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे वृत्त ठाण्यात वाऱ्यासारखे पसरले. रुग्णालय परिसरात परमार यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी गर्दी केली होती. परमार यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकेलेले नाही.

या प्रकरणी कासारवडवली पोलीस तपास करत आहेत. परमार यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडल्याचे सूत्रांकडून कळते. मात्र, पोलिसांनी त्यास दुजोरा दिलेला नाही.  त्यामुळे परमार यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी  परमार यांच्या नातेवाईकांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीतही ते कोणत्या दबावाखाली होते का, याबाबत माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे परमार यांच्या आत्महत्येचे गूढ वाढू लागले आहे.

’कॉसमॉस बिल्डर्सचे मालक व एमसीएचआयचे अध्यक्ष सूरज परमार यांनी स्वतवर गोळ्या झाडून घेतल्या

’घोडबंदर येथे स्वतच्या कार्यालयातच आत्महत्या

’आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

’कासारवडवली पोलिसांकडून तपास सुरू

सूरज परमार यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी तपासातून समोर येत आहे. असे असले तरी आम्ही विविध अंगांनी या प्रकरणाचा तपास करीत आहोत, तसेच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
  – व्ही. बी. चंदनशिवे, पोलीस उपायुक्त