ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील शिपाई राजेश यशवंत जाधव (४३) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. नवीन नळजोडणी देण्यासाठी त्याने ही लाच स्वीकारल्याचे कारवाईतून समोर आले आहे.

महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीमध्ये पाणीपुरवठा विभागात राजेश जाधव हा शिपाई पदावर काम करतो. त्याने नवीन नळजोडणी देण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली होती. तडजोडी अन्ती पाच हजार देण्याचे ठरले. या संदर्भात तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने सापळा रचून राजेशला पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडले. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक दीपक दळवी करीत आहेत.

सख्ख्या भावाचा खून

कळवा : दारू पिण्यासाठी पैसे मागितले म्हणून सख्या भावालाच ठार मारल्याची घटना कळवा परिसरात घडली आहे. येथील मातोश्री जानकीनगर परिसरातील साईलीला चाळीत थोरात कुटुंब राहते. या कुटुंबातील विलासला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे तो दारूसाठी सतत मोठा भाऊ दिलीप याच्याकडे पैसे मागत असे. या कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. मंगळवारी रात्रीही विलासने दारूसाठी पैशांची मागणी केली. त्याचा राग आल्याने दिलीपने त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारच्या धडकेत महिला ठार

ठाणे : येथील तीनहात नाका परिसरात कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर तिचा पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रघुनाथनगरमध्ये राहणारे कृष्णा वाघे व त्यांची पत्नी शेवंती हे दाम्पत्य शुक्रवारी रात्री तीनहात नाका परिसरातून जात होते. त्या वेळी मुंबई दिशेला जात असलेल्या एका कारचालकाने त्यांना धडक दिली. त्यात शेवंती (२९) यांचा मृत्यू झाला तर कृष्णा हे गंभीर जखमी झाले आहेत. खासगी रुग्णालयात कृष्णा यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारचालक भरत जैस्वार याच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

डोंबिवली : पाळणाघरात जेवण बनविण्याचे काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर पाळणाघरातच लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून पीडित मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ दीपक हेरोळे याने हा प्रकार केला आहे. पूर्वेतील शिळ रोड परिसरात पीडित मुलगी राहत असून ती अकरा वर्षांची आहे. ती चंद्रेश व्हिला लोढा हेवन येथील पाळणाघरात जेवण बनविण्याचे काम करते. तिथेच दीपकने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. गेल्या वर्षभरापासून तो तिच्यावर अत्याचार करीत होता. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात दीपकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दुकानाला आग

नवी मुंबई : घणसोली सेक्टर ५ येथील गादीच्या दुकानाला बुधवारी रात्री आग लागली. या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून इमारतीमधील दुकानावरील एका घराच्या गॅलरीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागताच वाशी व ऐरोली येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. विद्युत वायरच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. या आगीमध्ये दुकानावरील एका घराच्या बाल्कनीचेदेखील नुकसान झाले आहे.

दुचाकीची चोरी

नवी मुंबई : कोपरखरणे सेक्टर १५ येथील संजय मोरे यांच्या राहत्या घरासमोर पार्क करून ठेवलेली २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा एमएच ०५ सीटी २२०९ ही चोरीस गेली. या प्रकरणी कोपरखरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.