पूर्व भागातील सोनारपाडा परिसरात संतोष पाटील यांना एका भामटय़ाने एका नामांकित कंपनीच्या कॉल सेंटरमधून विमा काढण्याच्या निमित्ताने ३० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ५० हजार रुपये गुंतवल्यास २ लाख ९३ हजार रुपये मिळतील, असे आमिष त्याने पाटील यांना दाखवले. त्याच्या भूलथापांना बळी पडत पाटील यांनी ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, ही रक्कम त्याने संबंधित कंपनीच्या खात्यात जमा केली नाही. तसेच एका नामांकित बॅँकेचा २ लाख ९३ हजार रुपयांचा खोटा धनादेश त्यांना दिला. हा प्रकार उघडकीस येताच आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती.
सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ
ठाणे : ठाणे तसेच आसपासच्या शहरात रविवारी दिवसभरात सोनसाखळी चोरीच्या पाच घटना घडल्या असून यात चोरटय़ांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. मुलुंड परिसरात राहणाऱ्या अर्चना चाळके (५८) या चरई परिसरातून पायी जात होत्या. त्या वेळी चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. याच परिसरात त्या दिवशी गीता नायक यांच्या गळ्यातील ४८ हजारांचे मंगळसूत्र चोरटय़ांनी खेचून नेले. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात विजयलक्ष्मी मुदलियार (४२) यांच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र मोटारसायकवरून आलेल्या चोरटय़ांनी खेचून नेले. अंबरनाथ (पूर्व) भागातील कानसई परिसरात राहणाऱ्या विद्या कोठावदे (५०) यांच्या दहा हजारांचे मंगळसूत्र खेचले. तर सीमा दलाल (५३) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न झाला.
वसंतविहार परिसरात हेमलता नणदिवे (५८) या पदपथावरून पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी खेचली.
मिलापनगरात दोन घरफोडय़ा
डोंबिवली : येथील पूर्व भागातील मिलापनगरमधील मोनालिसा सोसायटीमध्ये विनायक कांगणे यांच्या घरी शनिवारी सायंकाळी चोरटय़ांनी सुमारे १ लाख २१ हजारांचा ऐवज लुटला. यात सोन्याचे दागिने व रोख रकमेचा समावेश आहे. घरातील हॉलच्या खिडकीची ग्रिल उचकटून चोरटय़ांनी ही चोरी केली.
 या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिलापनगरातील राहुल जडे राहत असून रविवारी सकाळी ते कुटुंबासोबत मुंबईतील फोर्ट परिसरात फिरायला गेले होते.
याच संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी घरातील देवघराच्या मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने, असा सुमारे ४ लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.