बाके उखडली; झाडांच्या कुंडय़ांचे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान; दोघे अटकेत

ठाणे महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या कचराळी तलावाजवळील उद्यानामध्ये चार तरुणांनी अर्धा तास धुडगूस घालत विविध साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी पहाटे घडला.

सुरक्षारक्षकांना दगडांचा धाक दाखवून उद्यानात शिरलेल्या चौघांनी परिसरातील चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, उद्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तोडफोडीची चित्रीकरण कैद झाले असून त्याआधारे नौपाडा पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात कचराळी तलाव असून तो महापालिका मुख्यालयासमोरच आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने तलावाचे सुशोभीकरण केल्याने त्याला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. नागरिकांना चालण्यासाठी तलावाच्या काठावर पदपथ, उद्यान, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, नागरिकांना बसण्याकरिता बेंच आणि विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. याशिवाय, याच भागात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्रही उभारण्यात आले आहे. त्यामुळे या तलावाचा संपूर्ण चेहराच बदलला असून या भागात सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते.

या तलाव परिसरात महापालिकेने सुरक्षारक्षक नेमले आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास चार तरुण कचराळी तलवाच्या प्रवेशद्वाराजवळ आले आणि त्यांनी हातातील दगडांचा धाक दाखवून सुरक्षारक्षकाला एका कोपऱ्यात बसण्यास सांगितले. त्यानंतर चौघांनी तलाव परिसरातील बेंच उखडले, कचरा कुंडय़ा उचलून तलावात फेकल्या, झाडांच्या कुंडय़ांची तोडफोड केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली असून त्यामध्ये दहापैकी चार कॅमेऱ्यांचे नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास चौघांचा तलाव परिसरात धुडगूस सुरू होता.

सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष

महापालिका मुख्यालयात शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलाव परिसरात हा प्रकार घडत असतानाही त्याकडे त्यांचे लक्ष गेले नाही. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात महापालिकेने तक्रार दिली असून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे दोघांना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.