राज्यात विविध ठिकाणी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. आंदोलन मागे घेतल्यानंतर वातावरण निवळले असतानाच आता ठाण्यातही सिव्हिल रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णाला चांगल्या प्रकारे उपचार मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णासोबत चार ते पाच जण होते. रुग्णाला उपचार चांगल्या प्रकारे मिळत नसल्याचा आरोप करून त्यांनी शिकाऊ डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोडही केली आहे. यामुळे डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठाण्यातील महागिरी परिसरातील व्यक्तीच्या हाताला जखम झाली होती. हातातून रक्तस्राव होत होता. त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यासोबत चार ते पाच जण होते. रुग्णावर व्यवस्थित उपचार केले जात नसल्याचा आरोप करून त्यांनी डॉक्टर जावेद शेख आणि डॉक्टर अन्सारी यांना मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयाची तोडफोडही केली, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, हल्लेखोरांना अटक न केल्यास कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीचे पालन करत शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून डॉक्टर कामावर रुजू झाले. पाच दिवस सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे मुंबईसह राज्यभरातील सरकारी रुग्णालयाची व्यवस्था कोलमडली होती व हजारो रुग्णांना त्रास सहन करावा लागला होता. महिन्याभरात डॉक्टरांना मारहाणीच्या पाच ते सहा घटना घडल्या होत्या. शीव रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर तेथील निवासी डॉक्टरांनी काम बंद केले होते. सोमवारी इतर निवासी डॉक्टरांनीही रजा आंदोलन सुरू केले. इंडियन मेडिकल असोसिएशननेही निवासी डॉक्टरांना पाठिंबा देत खासगी सेवाही बंद केल्या होत्या. आपत्कालीन सेवांव्यतिरिक्त सर्व वैद्यकीय सुविधा बंद राहिल्याने तसेच शस्त्रक्रिया अडल्याने राज्यभरातील रुग्णांचे हाल झाले होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन देऊनही निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन मागे घेतले नव्हते. आश्वासन देऊनही सुरक्षाव्यवस्था न वाढल्याने तसेच हल्ले सुरूच राहिल्याने डॉक्टरांनी आंदोलन सुरू ठेवले होते. मार्ड संस्थेने अधिकृतरीत्या संप पुकारला नव्हता. त्यामुळे उच्च न्यायालयाने गुरुवारी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेला आंदोलन मागे घेण्याचा आदेश देऊनही बहुतांश डॉक्टरांनी आंदोलन सुरू ठेवले होते. अखेर शुक्रवारी उच्च न्यायालयाने शनिवारी सकाळी आठनंतर कामावर उपस्थित न होणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यास अनुमती दिली. त्यानंतरही शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांच्या संपाबाबतच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम होता. अखेर मध्यरात्रीनंतर डॉक्टरांनी भूमिका सौम्य केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीनुसार शनिवारी सकाळी निवासी डॉक्टर कामावर हजर झाले होते.