संवेदनशील भागांसाठी आधुनिक उपाययोजना

आरोप-प्रत्यारोप, आश्वासने, घोषणा, टीका यांचा राजकीय धुरळा उद्या, रविवारी सायंकाळनंतर शांत होणार असतानाच, आता येत्या मंगळवारी, २१ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया निधरेक पार पडावी, यासाठी पोलीस व निवडणूक यंत्रणांनी कंबर कसली आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी जय्यत तयारी केली असून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येणार आहे. ठाणे आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांतील संवेदनशील भागांमध्ये चोख बंदोबस्त करण्यासोबतच आधुनिक उपाययोजनाही राबवण्यात येणार आहेत. ठाण्यात आठ तर उल्हासनगरात चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर होणार असल्याने पोलीस नियंत्रण कक्षात कोणत्याही गैरप्रकाराची माहिती लगेच समजू शकणार आहे.

ठाणे तसेच उल्हासनगर महापालिका निवडणुकांचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असून या दोन्ही महापालिकांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दोन्ही महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी संपणार असल्याने प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढविला असून मतदारांच्या भेटीगाठींवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे आणि इतर वस्तूंची प्रलोभने दाखविली जातात. तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गुंडाच्या मुसक्या आवळून शहरात स्थानिक पोलिसांची गस्त वाढविली आहे.

ठाणे तसेच उल्हासनगर या दोन्ही शहरात मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या दोन्ही शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये ठाण्यात ९७ तर उल्हासनगरमध्ये ३० संवदेनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गेल्या निवडणुकांमध्ये ज्या भागात हाणामारी आणि मतदारांमध्ये दहशत माजविणे असे प्रकार घडले होते. तसेच ज्या भागात चुरशीच्या लढती झाल्या होत्या. अशा भागांची यादी पोलिसांनी तयार केली असून अशा संवेदनशील भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांची गस्तही वाढविण्यात येणार आहे. याशिवाय, यंदा अशा भागांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून अशा भागांवर ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांमार्फत नजर ठेवली जाणार आहे.

ठाणे तसेच उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि मतदान शांततेत पार पडावे, यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. या कॅमेऱ्यांद्वारे अशा भागांतील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

-आशुतोष डुंबरे, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त