उन्हाळ्याच्या सुट्टीचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. पुन्हा एकदा शाळा आणि अभ्यासाच्या चक्रात अडकण्याआधी फुरसतीचे हे क्षण अविस्मरणीय व्हावेत यासाठी विवियाना मॉलने खास खेळ आयोजित केले आहेत. विवियाना मॉलने ‘द अँग्री बर्डस्’ या सिनेमाशी खास करार केला असून या लोकप्रिय व्यक्तिरेखांची जादू निर्माण करण्यासाठी आणि प्रेक्षकांना खेळावर आधारित असलेल्या सिनेमाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मॉलमध्ये सिनेमाच्या संकल्पनेवर आधारित गेम्स झोन आणि १६ फुटांच्या मोठय़ा रंगमंचावर व्यक्तिरेखांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे येथील वातावरण आणखी रंगतदार झाले आहे. विवियाना मॉलने ‘हिट द पिग’ आणि ‘फीड द पिग’ असे दोन खास गेमिंग झोन उभारले आहेत. तिथे प्रेक्षकांना प्रत्यक्षात या बर्ड्सच्या दुनियेचा अनुभव घेता येईल. मॉलमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धामधील विजेत्यांना अँग्री बर्डस सिनेमात वापरलेल्या तसेच बर्डस्चे चित्र असणाऱ्या वस्तू जिंकता येणार आहेत. कधी : शनिवार व रविवार, २८,२९ मे २०१६ कुठे : विवियाना मॉल, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे (प.) रफी-गीतांची मैफल ठाण्यातील वुई अॅण्ड मी या संस्थेतर्फे सुप्रसिद्ध पाश्र्वगायक महम्मद रफी यांनी गायलेल्या अजरामर गाण्यांवर आधारित खास मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वुई अॅण्ड मी’ ही संस्था शहरातील सुप्रसिद्ध रेस्टॉरंटस्चा पारितोषिक देऊन गौरव करते. या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने गाण्याची मैफल होईल. गायक शैलेंद्र जाधव रफी-गीते सादर करतील. शनिवार, २८ मे रोजी रात्री ८.३० वाजता काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.) येथे हा कार्यक्रम होईल. कधी : शनिवार, २८ मे केव्हा : रात्री ८.३० वाजता कुठे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, हिरानंदानी मेडोज, ठाणे (प.) कमीतकमी वेळेत घर सजवा हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये घर सजवण्यासाठी अनेकांना फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घर सजवण्याचे काम केले जाते. कमीत कमी वेळेत घर कसे सजवावे, याबाबतीत नोकरदार महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. डोंबिवलीतील रेखा पाठक या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये डिझायनर सॅटीन कुशन आणि होममेड डेकोरेटिव्ह टेबल लॅम्प बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २७ ते २९ मे या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ओम नीलकंठ, कृपा बी-३, गोपाळ नगर लेन-१, डोंबिवली (पू) येथे ही कार्यशाळा होईल. नाव नोंदणीसाठी संपर्क-९८३३३८०५१३ कधी : २७ ते २९ मे, केव्हा : दुपारी १२ ते सायंकाळी ५ कुठे : ओमनीलकंठ, कृपा बी-३, गोपाळ नगर लेन-१, डोंबिवली (पू) मेकअपच्या साध्या, सोप्या क्लृप्त्या बहुतेक महिला चित्रपटातील नायिकांनी वापरलेल्या आभूषणांची, त्यांच्या मेकअपची नक्कल करीत असतात. मात्र नेहमी पार्लरमध्ये जाणे जमत नाही. तसेच आर्थिकदृष्टय़ाही ते परवडणारे नसते. त्यामुळे घरच्या घरी चेहरा खुलविणारा मेकअप कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ‘कोरम मॉल’मध्ये ‘वुमन्स ऑन वेन्सडे’ उपक्रमात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मेकअपच्या साध्या, सोप्या टिप्स शिकविल्या जाणार आहेत. तसेच केशभूषा आणि वेशभूषा यांचेही मार्गदर्शन या वेळी केले जाईल. प्रवेश विनामूल्य आहे. कधी- बुधवार, १ जून केव्हा : दुपारी ३ ते रात्री ८ कुठे : कोरम मॉल, मंगल पाडे मार्ग, कॅडबरी कम्पाऊंडजवळ, पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ, ठाणे(प.) अशोक पत्कींकडून भावसंगीताचे धडे ‘राधा ही बावरी’, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’, ‘सजल नयन’, ‘टांग टिंग टिंगा’, ‘दिस चार झाले मन’ यासारखी एकापेक्षा एक सदाबहार गाणी देणारे सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की बदलापूरमध्ये भावसंगीताचे धडे देणार आहेत. आविष्कार क्रिएशन्सच्या वतीने २७ ते २९ मे असे तीन दिवस काटदरे मंगल कार्यालय, गांधी चौक, बदलापूर पूर्व येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नोटेशनचे महत्त्व, तंत्र, संगीताचा रियाज आदी विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाईल. तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आवडीचे एक गीत स्वत:च्या आवाजात, अद्ययावत रेकॉर्डिग स्टुडीयोत रेकॉर्डिग करण्याची संधीही या निमित्ताने प्राप्त होणार आहे. सहभाग घेण्यासाठी संपर्क- ९९६०५५१८५७ किंवा ७०३०३०६८४६ कधी : २७ ते २९ मे कुठे : काटदरे मंगल कार्यालय, गांधी चौक, बदलापूर (पू) आभासी जगावर भाष्य करणारे ‘आयडी’ सध्या फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपसारख्या समाज माध्यमांनी एक समांतर असे अभासी जग आपल्यासमोर उभे केले आहे. त्यात आपल्याला आपली हवी तशी प्रतिमा उभी करण्याची मुभा असते.v प्रत्यक्ष जग आणि अभासी जग अशा दोन्ही जगांचे एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रभाव पडत असतात. अशा परिस्थितीमध्ये जगताना संभ्रम निर्माण होतात. याविषयी भाष्य करणारे ‘आयडी’ हे नाटक महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, ऐरोली शाखेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- २७७९१८३७ किंवा २७७९०८३६ कधी : शनिवार, २८ मे केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता कुठे- महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड-ऐरोली शाखा, म. बा. देवधार संकुल, प्लॉट नं-२४-२५, सेक्टर १७, ऐरोली, नवी मुंबई सी.के.पी. खाद्य महोत्सव चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज खवय्या मानला जातो. या समाजाचे वैशिष्टय़ म्हणजे ते खाण्यासाठी आणि खिलवण्यासाठी उत्सुक असतात. कोलंबीची खिचडी, चिंबोऱ्याचे कालवण, वालाचे बिरडे, खाज्याच्या करंज्या, तेलपोळी हे पदार्थ बनविण्यात त्यांची खासियत आहे. झणझणीत मच्छीचा रस्सा-भाकरी, भाजणीचे वडे-मटण, तळलेले पापलेट, सुरमई, जिताडे याची अस्सल सी.के.पी. चव चाखण्याची संधी येत्या शनिवारी आहे. कारण सी.के.पी. स्थानिक सभा या संस्थेच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सभागृहात शनिवार, २८ मे रोजी संध्याकाळी ६ ते ९ आणि रविवार, २९ मे रोजी सकाळी ११ ते २ व संध्याकाळी ५ ते ९ ही ‘खाद्य मैफल’ होईल. रविवारी सायंकाळी ५ वाजता संस्थेच्या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा होणार आहे. या सी. के. पी. फूड फेस्टिव्हलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाची रेलचेल असणार आहे. कधी : २८ व २९ मे कुठे : सी.के.पी. हॉल, राम गणेश गडकरी मार्ग, कारवा हॉस्पिटलजवळ, डोंबिवली (पूर्व) भूतान आणि लडाखचे छायाचित्र दर्शन पृथ्वीवरील स्वर्ग असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या भूतान तसेच लडाख परिसरात एकदा तरी जाता यावे, अशी प्रत्येक हौशी पर्यटकांची इच्छा असते. हिरवागार परिसर, काचेसारखे नितळ वाहते पाणी असणाऱ्या नद्या, बर्फाच्छादित डोंगर, तेथील वैशिष्टय़पूर्ण स्थापत्य पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. मिडअर्थ या संस्थेच्या वतीने शुक्रवार ते रविवारदरम्यान ठाणे कलाभवनमधील भातसा कलादालन येथे लेह आणि लडाखमधील छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तिन्ही दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी आठदरम्यान हे प्रदर्शन सर्वासाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. कधी :२७ ते २९ मे रोजी केव्हा : सकाळी ११:०० ते सायंकाळी ८:०० पर्यंत कुठे: भातसा कलादालन, ठाणे कलाभवन, कापूरबावडी, ठाणे (प.)