थेट कचराभूमीवर..

ठाणे शहराच्या वेशीवरच मुंबईचे एक महत्त्वाचे उपनगर असलेल्या मुलुंडची कचराभूमी आहे. ठाणे-मुंबईला जोडणाऱ्या महामार्गाच्या कडेलाच असणाऱ्या या भूखंडावर वर्षांनुवर्षे मुंबई शहराचा कचरा आणून टाकला जातो. पावसाळ्यात या कचराभूमीतील चिखलात पाय रुतवून काम करताना या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना अक्षरश: नाकीनऊ येतात. अर्धा पाय रुतेल इतका मातीचा गाळ, दरुगधीच्या या मातीच्या गाळातूनच कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी ट्रकचालकांना करावे लागणारे दिव्य, कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या होते की नाही हे पाहण्यासाठी दर दीड तासाने कचराभूमीवर प्रत्यक्ष भेट देणारे पालिका कर्मचारी असे चित्र या कचराभूमीवर पाहायला मिळते.

पावसाळ्यात या कचराभूमीवर काम करणे म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. या कचराभूमीच्या संपूर्ण परिसरात फिरले असता ठिकठिकाणी कोपऱ्यात खोपटी बांधून भंगारविक्रेते हा कचरा वेगळा करण्याचे काम शांतपणे करताना दिसतात. कचरा विलग करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे खरं तर स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. मात्र पालिका प्रशासन कचरा विलगीकरणासाठी या भंगारविक्रेत्यांवरच अवलंबून आहे. विशेष म्हणजे या बदल्यात पालिकेकडून त्यांना कोणत्याही स्वरूपाचा मोबदला मिळत नाही. कचऱ्यात मिळणारे सामान विलग करायचे आणि जे उपयुक्त असेल ते विकायला घेऊन जायचे हा या कचराभूमीवर काम करणाऱ्या भंगारविक्रेत्यांचा दिनक्रम आहे. वेगळा केलेला कचरा शेठकडे जमा करायचा व किलोमागे दीड रुपया मिळवायचा. दिवसाला साधारण ६०० ते ६५० रुपयांपर्यंतची कमाई मिळत असल्याचे या कचराभूमीवर काम करणाऱ्या शबाना शेख या महिलेने सांगितले.

साप, विंचवांचे भय

भल्यामोठय़ा कचऱ्याच्या ढिगातच काम करताना येथील भंगारविक्रेतेही सावध असतात. डोंगरचे डोंगर कचऱ्यांनी व्यापलेले असल्याने या कचऱ्यातून वाट काढताना दरुगधीसोबतच साप, विंचू यांची भीती असते. मात्र, जीव धोक्यात घालून हे काम करावेच लागते, असे हे भंगारवाले सांगतात.

गमबूटशिवाय काहीच सुरक्षा नाही

कचराभूमीवर काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनातर्फे साध्या गमबूटशिवाय इतर कोणतीही सुरक्षा नाही. दर दीड तासाने कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने होते की नाही, ट्रकमध्ये योग्यरीत्या कचरा वाहून जातो का हे पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना कचराभूमीवर जावे लागते. तिथपर्यंत जाताना नाकाला बांधण्यासाठी पालिकेतर्फे मास्क पुरवणे गरजेचे असले तरी या कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. संध्याकाळी तर डासांमुळे एका जागी उभे राहता येत नसल्याने या ठिकाणचे काम म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.