ठाणे येथील तीन हातनाका भागातील हरदीप इमारतीमध्ये असलेल्या ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मंगळवारी पहाटे पडलेल्या दरोड्याची ठाणे गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसात उकल केली. याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, दरोडेखोरांकडून ३ कोटी १२ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित फरारी आरोपींच्या पोलीस मागावर आहेत. मंगळवारी पहाटे ‘चेकमेट’च्या कंपनीमध्ये सशस्त्र दरोडा पडल्याची तक्रार मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्वरित चौकशीची सुत्रे हलवली.

पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून दरोडेखोरांनी कंपनीतून सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले होते. याशिवाय, कंपनीच्या सुरक्षा रक्षकांचे मोबाईल देखील दरोडेखोरांनी नेले. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असून, यात कंपनीतीलच कर्मचाऱयांचा सहभाग असू शकतो, असा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांनी सर्वप्रथम कंपनीच्या सर्व कर्मचाऱयांची चौकशी केली. त्यातून काही धागेदोरे मिळाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा एका संशयित कर्मचाऱयाला अटक करण्यात आली.

कंपनी इमारतीच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर पैसे घेऊन पळताना दिसत आहेत. मात्र, घटनेच्या वेळी पाऊस पडत असल्याने फुटेजमधील चित्र धुरकट दिसत असल्यामुळे दरोडेखोरांची ओळख पटविण्यात अडचण निर्माण झाली होती. अखेर अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱयाची कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची उकल झाली. पोलिसांनी आरोपींकडून दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या तीन झायलो कार देखील ताब्यात घेतल्या. याशिवाय, या कटात सहभागी असलेल्या इतर पाच जणांना देखील सापळा रचून त्वरित अटक करण्यात आली, तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके राज्यात आणि राज्याबाहेर फरारी आरोपींच्या मागावर असल्याचे, पोलीस आयुक्त परवमीर सिंग यांनी सांगितले.

अटक करण्यात आलेले आरोपी-
– नितेश भगवान आव्हाड (२२)
– अमोल कर्ले (२६)
– आकाश चव्हाण
– मयुर कदम (२१)
– उमेश वाघ (२८)
– हरीश्चंद्र मते (३०)


दोन कर्मचाऱ्यांचा कट
‘चेकमेट’ कंपनीवरील दरोड्याचा कट आकाश चव्हाण आणि उमेश वाघ या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी आखला होता, ज्यात या कंपनीच्या काही माजी कर्मचाऱ्यांनीही त्यांना साथ दिली.  आकाश चव्हाण याने नुकतेच फेब्रुवारी महिन्यात या कंपनीतून नोकरी सोडली होती. त्याच्या जागी उमेश वाघ या तरुणाला नोकरी देण्यात आली होती. या दोघांनी संगनमतातून कट रचून दरोडा टाकला. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे नाशिक परिसरातील आहेत.