ठाण्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. इतर आरोपींनाही लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालयातील तीन शिकाऊ डॉक्टरांना रुग्णासह त्याच्या नातेवाईकांनी बुधवारी मारहाण केली होती. त्यात एका महिला डॉक्टरचाही समावेश होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचीही तोडफोड केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर नातेवाईकांनी तेथून पलायन केले होते. ठाण्यातील महागिरी भागात मुझम्मील मेनन राहतो. त्याचे भावासोबत भांडण झाले होते. त्यात त्याच्या हाताला मार लागला होता. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. हातातून रक्त वाहत असल्याने शिकाऊ डॉक्टर जावेद शेख यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. उपचारादरम्यान ज्या हाताला मार लागला होता, त्याच हाताला सलाईन लावण्याचा आग्रह मुझम्मीलने धरला होता. मात्र, जखम झाल्याने त्या हाताला सलाईन लावता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. याच कारणावरून त्याने डॉक्टरांशी वाद घातला होता. तसेच त्यांना लाथेने मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉ. शेख यांच्यासोबत असलेल्या इतर दोन डॉक्टरांनाही त्याच्या नातेवाईकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्णालयाचीही तोडफोड केली होती. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करून जोपर्यंत सुरक्षा पुरवली जात नाही, तोपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. रुग्णाच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला होता. ठाण्यातील डॉक्टरांच्या संघटनेनेही सरकारी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. मुंबईतील शीव येथील रुग्णालयाप्रमाणे सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावेत, अशी मागणी केली. तर ठाणे नगर पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. इतर हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली.