एकीकडे ठाणे शहरातील नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे आज पावसाचा फटका ठाणेकरांना बसला असताना दुसरीकडे ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कळवा परिसरातील नालेसफाईचा दौरा करुन रेल्वेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी हद्दीच्या वादाच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात महापौरांनी नाराजीदेखील व्यक्त केली. नाल्यातून काढलेला गाळ तसाच राहिल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरल्याचा दावा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

दरवर्षी कळवा पूर्वेकडील अशोक नगर, तसेच न्यू शिवाजी नगर या ठिकाणच्या घरांमध्ये पाणी शिरते. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या ठिकाणांचा आज दौरा केला. या परिसरातील नाल्याची क्षमता ५० मिलीमीटर पावसासाठी पुरेशी आहे. परंतु आज या ठिकाणी सकाळच्या सुमारास ७१ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे तसेच रेल्वेच्या चुकीमुळेच लोकांच्या घरी पाणी शिरल्याचा दावादेखील महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.