ठाणे महापालिका आयुक्तांचे मालमत्ता कर आणि पाणी बिल वसुलीचे आदेश
यंदाच्या वर्षांत मार्चअखेपर्यंत मालमत्ता करातून ३५५ कोटी, तर पाणी बिलातून १२० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर वसुलीच्या बाबतीत कोणतीही हयगय चालणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मालमत्ता कराची आतापर्यंत ३०७ कोटी तर पाणी बिलाची ९९ कोटी रुपये इतकी वसुली झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी दोन्ही विभागांकडे केवळ आठ दिवसच शिल्लक असल्याने त्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये मालमत्ता कर आणि पाणी बिल वसुलीचा आढावा त्यांनी घेतला. गेल्या वर्षी २९३ कोटी रुपये इतकी मालमत्ता कराची वसुली झाली होती. यंदा मालमत्ता कराची ३०७ कोटी रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे मार्च अखेपर्यंत एकूण ३५५ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आयुक्तांनी दिले आहे, तसेच गेल्या वर्षी ८० कोटी रुपये इतकी पाणी बिलाची वसुली झाली होती. यंदा १२० कोटी रुपये वसुलीचे आदेश आयुक्तांनी दिले.

कारवाईचे आदेश
मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी मालमत्ताधारकांना १४ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतरही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात १५ एप्रिलपासून वसुलीची कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. ही कारवाई करताना संबंधित मालमत्तेचा पाणीपुरवठा खंडित करणे, मलनि:सारण वाहिन्या बंद करणे याबाबत नोटीस पाठवण्यात येईल.