प्रभागनिहाय कामांच्या सूचना नागरिकांकडून मागवणार

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या अपेक्षांचे प्रतििबब उमटावे यासाठी पालिका प्रशासनाने अर्थसंकल्प कसा असावा आणि त्यामध्ये कोणत्या योजनांचा समावेश असावा यासाठी प्रथमच नागरिकांच्या सूचना मागविण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर ठाणेकरांना अर्थसंकल्पाविषयी सूचना नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. या सूचना विचारात घेऊनच यंदाचा अर्थसंकल्प तयार केला जाईल, असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी स्पष्ट केले. पंचवार्षिक आराखडा तयार करत असताना वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी आणि नागरिकांच्या सूचनांचा योग्य तो ताळमेळ राखला जाईल, असा दावाही या वेळी जयस्वाल यांनी केला.

महापालिकेच्या एकूण जमा-खर्चावर अर्थसंकल्प सादर केला जातो. गेल्या दोन वर्षांत महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली  असून १२०० कोटी रुपयांवरून ते दोन हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसुलात तब्बत ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असा दावा आयुक्त जयस्वाल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये पुढील पाच वर्षांचा दृष्टिकोन मांडला जाणार आहे. त्यानुसार तयार करण्यात येणाऱ्या आराखडय़ात ठाणे शहराच्या विकासासाठी आणखी काय करता येईल यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नागरिकांना मत मांडण्याची संधी देऊन त्यांच्या मताचा समावेश अर्थसंकल्पात करून घेणारी ठाणे ही पहिलीच महापालिका असेल असा दावाही त्यांनी केला.

१० दिवसांत सूचना नोंदवा

  • thanecity.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना आपल्या सूचना नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • या संकेतस्थळावर दहा दिवसांत सूचना नोंदवू शकतात.
  • महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालये, बसस्थानके येथे सूचनांसाठी मतपेटी उपलब्ध असेल.
  • संकेतस्थळ, मतपेटीच्या माध्यमातून आलेल्या सूचनांचे संकलन करून त्या अर्थसंकल्पात कशा पद्धतीने समाविष्ट करता येतील याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
  • नागरिकांनी कोणत्या सूचना पाठविल्या व त्यावर प्रशासनाने कोणत्या सुधारणा केल्या हे महापालिकेच्या माध्यमातून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.