जेमतेम नऊ तासांच्या धडक कारवाईत मुंब्रा शहरातील सुमारे चौदाशेच्या आसपास बांधकामे जमीनदोस्त करत ठाणे महापालिकेने पोलिसांच्या साथीने बुधवारी एका वेगळ्या विक्रमाची नोंद केली. ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीचा आनंदोत्सव फटाके वाजवून साजरा करत वाळू तस्कर खाडीत उपशासाठी बोटी सोडू लागल्याचे विदारक चित्र एकीकडे दिसत असताना विस्कटलेल्या शहरांची काही प्रमाणात अजूनही घडी बसवता येऊ शकते, असे आशादायक चित्र मुंब्य्रातील या कारवाईमुळे निर्माण झाले आहे. एरवी मुंब्य्रात एखादी लहानशी टपरी पाडायची असेल तरी महापालिका अधिकाऱ्यांचे हात कापत. त्यामुळे वातानुकूलीत दालनात बसून मुंब्य्राची सफाई करा, असे आदेश अधिकाऱ्यांना देऊन भागणार नव्हते. संजीव जयस्वाल आणि परमबीर सिंग या दोघा अधिकाऱ्यांनी हे भान राखत स्वत: रस्त्यावर उतरून या मोहिमेचे नेतृत्व केले. प्रशासकीय नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरविले तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठच मुंब्य्राच्या निमित्ताने घातला गेला आहे.
टी. चंद्रशेखर यांच्या काळात ठाण्यात रस्ते रुंदीकरणासाठी राबविण्यात आलेली मोहीम गाजली होती. त्यानंतर तब्बल २० वर्षांनंतर अशी धडाकेबाज मोहीम ठाणेकर अनुभवत आहेत. २००० सालच्या सुमारास ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ास राज्य सरकारने मंजुरी दिली. मुंबईसारख्या महानगराला पर्याय ठरू शकणाऱ्या या नगरीचा सुनियोजित विकास व्हावा, मोठे रस्ते, मोकळ्या जागा, करमणुकीची प्रशस्त ठिकाणे या नगरीत वास्तव्यास असलेल्या आणि नव्याने राहावयास येणाऱ्या नवठाणेकरांना उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने या आराखडय़ाची रचना करण्यात आली होती. झाले मात्र उलटेच. ठाणे, कळवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांना काही दशकांपासून बेकायदा बांधकामांनी पोखरून काढले आहे. गेल्या दहा, पंधरा वर्षांत मात्र अशी बांधकामे खोऱ्याने उभी राहिली. रस्त्यांच्या कडेला, नाल्यांवर, खारफुटी कापून, खाडीत भराव टाकून वाट्टेल त्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या या बांधकामांनी नागरीकरणाचा अक्षरश: घोट घेतला. ठरावीक राजकारणी, अधिकारी, गावगुंड, माफियांच्या सुवर्ण टोळ्यांनी या शहरांचे लचके तोडले.
अश्विनी जोशी, जयस्वाल, परमबीर, कल्याणात ई. रवींद्रन यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत सातत्याने मोहिमा राबवीत यापैकी काही रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ दिला आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी शहरातील रस्ते, बाजारपेठा, खाडी किनाऱ्यांवर राज्य गाजवू पाहणाऱ्या गावगुंडांच्या मुसक्या या अधिकाऱ्यांनी आवळल्या आहेत. मुंब्य्रातील एकही कोपरा असा नाही जेथे बेकायदा बांधकामांचे इमले उभे नाहीत. बुधवारची कारवाई छोटी वाटावी इतके हे प्रमाण अवाढव्य आहे. आमचे कुणीही
काही बिघडवू शकत नाही अशा तोऱ्यात वावरणाऱ्या येथील
ठरावीक मंडळींच्या मुजोर व्यवस्थेला जयस्वाल-परमबीर या द्वयीने
धक्का दिला आहे. ठाण्यातील सर्वपक्षीयांचे नतद्रष्ट राजकारण
पाहता नागरिकांनी या अधिकाऱ्यांमागे उभे राहून आता आपले कर्तव्य बजावायला हवे.