तलावांचे शहर अशी ओळख असणाऱ्या ठाण्यात आता २१ ठिकाणी थीम पार्क (मनोरंजन उद्याने) उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संकल्प उद्यानांची संकल्पचित्रे तयार करण्यात आली असून गुरुवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यासंबंधीच्या आराखडय़ांना मान्यता दिली. उद्याने आणि मोकळ्या जागांची वानवा असलेल्या ठाण्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्याने आणि हरित पट्टय़ांमध्ये वाढ होईल, असा दावा केला जात आहे. यासाठी व्यापक योजना आखली गेली असून त्यासाठी आठ उद्यान विशारदांची नेमणूक करण्यात आली आहे.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये मैदाने आणि उद्यानांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे तलावांचा परिसर हाच विरंगुळ्याचा पर्याय वर्षांनुवर्षे ठाणेकरांपुढे उपलब्ध आहे. या भागातही अतिक्रमणांचा वेढा पडल्यामुळे आता बडय़ा मॉलमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे विकास आराखडय़ात उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागांचा विकास केला जावा, अशी मागणी केली जात होती.
या पाश्र्वभूमीवर शहरात २१ मनोरंजन उद्याने विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’ (बीओटी) तसेच लोकसहभागातून ही उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. या मनोरंजन उद्यानांमध्ये फूड कोर्ट, मनोरंजनाची साधने, अ‍ॅम्पी थिएटर, संगीताची साधने, लहान मुलांसाठी क्रीडा कक्ष, छोटे मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प, हरित कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प आदी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने एंजल्स पॅराडाइज, स्मृतिवन, जॉगर्स पार्क, जुने ठाणे, बॉलीवूड अशा विविध थीम योजनांचा समावेश आहे.
या प्रकल्पांच्या आखणीत सहभागी असलेल्या आठ उद्यान विशारद कंपन्यांनी गुरुवारी या उद्यानांची संकल्पचित्रे आयुक्तांसमोर सादर केली. या संकल्पचित्रांना मान्यता देऊन योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पुढील १५ दिवसांत ठरवण्यात येणार असून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

या ठिकाणी ‘थीम पार्क’
बारा बंगला, वर्तकनगरमधील लक्ष्मी पार्क, जवाहर बाग येथील नेहरू बालोद्यान, सावरकर नगर, येथील नाना-नानी पार्क, कावेसर, उथळसर येथील डॉ. सलीम अली ऋतुचक्र प्लाझा, वर्तकनगर आदींसह एकूण २१ ठिकाणी ही थीम पार्क योजना राबवण्यात येणार आहे.