शिवसेना, राष्ट्रवादीची कार्यालयांवर बुलडोझर; येऊरमधील पाच बंगल्यांवरही कारवाई
ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी लहान-मोठय़ा व्यापाऱ्यांच्या दुकानांवर हातोडा चालविणाऱ्या ठाणे महापालिकेने गुरुवारी शहर नियोजनाचे लचके तोडणाऱ्या राजकीय अतिक्रमणांवर बुलडोझर चालवून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशाने गुरुवारी सकाळी येऊरच्या टेकडीवर चार पोकलेन चढविण्यात आले. त्यानंतर काही तासांतच या भागातील पाच बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. त्याचवेळी कळवा नाका अडविणारी शिवसेनेची शाखा जमीनदोस्त करण्यात आली आणि त्यापाठोपाठ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावरही हातोडा चालविण्यात आला.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागांमधील अतिक्रमणांवर हातोडा चालविला जात आहे. घोडबंदर, पोखरण, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील हजारो बांधकामे जमीनदोस्त केल्यानंतर गेल्या आठवडय़ात जयस्वाल यांच्या पथकाने मुंब््रयातील अतिक्रमणांना हात घातला. तीन दिवस सुरू असलेल्या कारवाईत या शहरातील तब्बल २२०० बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मुंब्र्या ची कारवाई आटोपून जयस्वाल मंगळवारपासून सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाई थांबेल अशी चर्चा सुरू असतानाच गुरुवारी सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख अशोक बुरपुल्ले आणि उपायुक्त संदीप माळवी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने थेट नेत्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवल्याने येथील राजकीय नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.
बुधवारी सकाळी पोखरण रस्ता क्रमांक-२ मध्ये अडथळा ठरणारी गांधीनगर भागातील शाखा पाडल्यानंतर गुरुवारी दुपारी अतिक्रमणविरोधी पथकाने थेट कळव्यातील शिवसेना शाखेवर बुलडोझर चढविला. ही कारवाई सुरू करण्यापूर्वी सकाळीच येऊरवर चार पोकलेन चढविण्यात आले. येऊरच्या जंगलात प्राण्यांच्या अधिवास क्षेत्रात राजकीय नेते, अधिकारी, उद्योजकांनी मोठाले बंगले उभारले आहेत. ठाण्यातील बडय़ा राजकीय नेत्यांच्या डोळे दिपविणाऱ्या बंगल्यांची आरासच या भागात दिसून येते. यापैकी काही बंगल्यांविषयी जयस्वाल यांच्याकडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्या होत्या. या बंगल्यांवर सकाळपासून कारवाई
सुरू करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक वरिष्ठ पदाधिकारी, शासनातील वरिष्ठ अधिकारी पद भूषविणारा एक मोठा लेखक तसेच काही उद्योजकांचे बंगले या वेळी जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई पूर्ण केल्यानंतर कळवा खाडीलगत असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावर कारवाई सुरू करण्यात आली. सुरुवातीला या कार्यालयातील छप्पर काढण्यात आले आणि सामान बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. कळवा खाडीवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलात हे कार्यालय बाधित होणार होते. त्यामुळे ते पाडलेच जाणार होते, असा दावा या वेळी महापालिकेतील सूत्रांनी केला.