लहान मुलांना वन्यजीवांचे आकर्षण असल्यामुळे प्रतिकृतींमधून लहानमुलांना वन्यजीवांची माहिती देण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेने केला आहे. मात्र, ठाणे पूर्व गणेश विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या बगिच्यातील वन्यजीवांच्या प्रतिकृतींची दुरवस्था झाली आहे. हत्ती उंट, काळविट, हरण, हंस प्राण्यांच्या प्रतिकृती तुटून खाली पडल्या असून हिरवळ हरवल्यामुळे बगिच्या उजाड झाला आहे. एकीकडे उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाल्यामुळे सर्वजण मुंबईतील राणीच्या बागेत फिरण्यासाठी जात असताना ठाण्यातील पालिकेच्या उद्यानाची मात्र दुरावस्था झाल्याचे दिसते.

गणेश विसर्जन घाट म्हणजे कोपरीकरांसाठी चौपाटीचा परिसर म्हणून ओळखला जातो. पहाटेपासून रात्रीपर्यंत या ठिकाणी वर्दळ असते, विसर्जन घाटावर येताना रस्त्याच्या मध्यभागी महापालिकेने १०० मिटर लांबीचा बगिचा आहे. या बगिच्यात कोणाला जाण्याची परवानगी नसली, तरी या वन्यजीवांच्या प्रतिकृतीमुळे बगिच्याची शोभा वाढली आहे. हत्ती, जिराफ, वाघ, माकड, गेंडा, सिंह, हरण, डायनासोर, काळविट, अजगर, झेब्रा कांगारु, हंस, अशा काही प्राण्यांच्या प्रतिकृती बसविल्या आहेत. या प्रतिकृती बघण्यासाठी पालक लहान  घेऊन या ठिकाणी येतात. मात्र पालिकेच्या भोगंळ कारभारामुळे या प्रतिकृती निस्तेज झाल्या आहेत, तर काही प्रतिकृती मोडकळीस आल्या आहेत.

महापालिकेने लाखो रुपये खर्च करुन या वन्यजीवांच्या प्रतिकृती बसविल्या आहेत, मात्र या प्रतिकृतींपैकी कांगारु, हरण, हंस काळविट अशा प्राण्यांच्या प्रतिकृतींची पडझड झाली आहे. बागिच्यामध्ये पालिकेने अनेक शोभेची झाडे लावली होती, मात्र झाडे सुकून गेल्यामुळे बगिचा उजाड झाला आहे. लोंखंडी ग्रीलही निखळून पडलेल्या दिसतात. महापालिकेने  बगिच्याची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी कोपरीकरांनी केली आहे.