आयुक्तांशी हुज्जत घालणाऱ्या नगरसेविकेच्या पतीला अटक

प्रभाग समिती निवडणुकीसारख्या एरवी छोटय़ा वाटणाऱ्या घडामोडीच्या निमित्ताने शुक्रवारी ठाणे महापालिकेत मोठे नाटय़ घडले. महापालिका मुख्यालयाच्या सभागृह परिसरात समर्थकांसह उभ्या असलेल्या शिवसेना नगरसेविकेच्या पतीने महापालिका आयुक्तांशी हुज्जत घातल्यानंतर सुरू झालेल्या या नाटय़ाचा पहिला अंक संबंधित आरोपीला महापौरांच्या ‘अँटिचेंबर’मधून पोलिसांनी अटक केल्यानंतर संपला. गर्दी केल्याप्रकरणी आयुक्तांनी अटकाव केल्यामुळे अपमानित झालेला नगरसेविकेचा पती आणि भल्या गर्दीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतापलेले आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यातील ‘तू तू मै मै’ची चर्चा शुक्रवारी दिवसभर रंगली होती.

ठाणे महापालिकेच्या विशेष समित्या तसेच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची शुक्रवारी सकाळी निवडणूक होती. ही प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेच्या गोकूळनगर परिसरातील नगरसेविका नंदा पाटील यांचे पती कृष्णा पाटील आपल्या समर्थकांसह दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाबाहेर उभे होते. अन्य नगरसेवकांचे समर्थकही याठिकाणी जमल्याने गर्दी झाली होती. त्याचवेळी आयुक्त संजीव जयस्वाल तेथे दाखल झाले. ‘ही गर्दी कशासाठी’ असा सवाल करत आयुक्तांनी सर्वानाच तेथून जाण्याची सूचना केली. तसेच आयुक्तांच्या सूचनेनंतर त्यांच्या अंगरक्षकांनी गर्दीला मागे सारण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतापलेल्या पाटील यांनी आयुक्तांना ‘मी तुमच्या केबिनमध्ये बसून दाखवेल’ असे उत्तर दिले. या उत्तराने आयुक्त संतप्त झाले व त्यांनी थोडय़ाच वेळात या ठिकाणी पोलिसांना पाचारण केले.

महापालिका मुख्यालयात दाखल झालेल्या पोलिसांनी मग महापौरांच्या  अँटिचेंबरमध्ये बसलेले कृष्णा पाटील यांना तेथून ताब्यात घेतले. यावेळी मध्ये पडलेल्या एका शिवसैनिकाला पोलिसांनी ‘प्रसाद’ दिल्याचेही समजते. दुपारनंतर पाटील यांच्यावर शिविगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि सरकारी कामात अडथळा आदी कारणांसाठी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणानंतर पालिका परिसरात प्रभाग समिती निवडणुकांची चर्चा मागे पडली आणि या घटनेचीच चर्चा सुरू झाली. पालिकेच्या विविध निवडणुकांच्यावेळी नेहमीच राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी होत असते. हे जाणत असतानाही आयुक्तांनी शुक्रवारी कडक पवित्रा घेतल्याबद्दल अधिकाऱ्यांतून आश्चर्य व्यक्त होत होते. तसेच पाटील यांनी आयुक्तांना चारचौघांत ‘मी तुमच्या केबिनमध्ये बसून दाखवेन’ असे सुनावल्याने अपमानित झालेल्या आयुक्तांनी त्याचा वचपा काढला, अशीही चर्चा पालिकावर्तुळात सुरू होती.