मालमत्ताधारकांना कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच बिले; पहिल्यांदाच एप्रिलअखेपर्यंत बिलांची छपाई होणार

ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना टपाल खात्यामार्फत पाठवण्यात येणारी मालमत्ता कराची बिले वेळेवर मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा मालमत्ताधारकांना पुन्हा पूर्वीप्रमाणेच कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच बिले पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महापालिका प्रशासनाने टपाल खात्याचा नाद सोडल्याचे आता स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मालमत्ताकर बिलांची छपाई एप्रिल महिन्याच्या अखेपर्यंत पूर्ण केली जाणार असून त्यामुळे मालमत्ताधारकांना ही बिले वेळेवर मिळू शकणार आहेत. याशिवाय, महापालिका संकेतस्थळावरही मालमत्ताकराची बिले उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना कराची बिले वेळेवर मिळावीत, यासाठी प्रशासनाने टपाल खात्याद्वारे कराची बिले पाठवण्यास सुरुवात केली होती. मात्र अनेक मालमत्ताधारकांना ही बिले वेळेवर मिळाली नव्हती. यापैकी काही मालमत्ताधारकांच्या घरी बिले पोहोचलेली नसताना महापालिकेने कराच्या थकबाकीसंबंधीच्या काढलेल्या नोटिसा मात्र घरपोच झाल्या होत्या. त्यामुळे टपाल खात्यामार्फत करांची बिले पाठवण्याची योजना वादात सापडली होती, तसेच या योजनेवरून महापालिका प्रशासनावर टीकेचा भडिमार होऊ लागला होता. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने यंदाच्या वर्षीपासून टपाल खात्यामार्फत कराची बिले पाठविण्याची योजना गुंडाळली आहे, तसेच यापुढे मालमत्ताधारकांना कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच बिले पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी मालमत्ताधारकांना कराची बिले पाठविण्यात येतात. मात्र जून अखेपर्यंत बिलांची छपाई सुरू असते. त्यामुळे मालमत्ताधारकांपर्यंत बिले पोहोचविण्यास उशीर होतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता बिले छपाईच्या कामाचा वेग गेल्यावर्षीपासून वाढविला असून गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेपर्यंत बिलांची छपाई केली होती. यंदाच्या वर्षी महापालिकेने बिलांच्या छपाईचा वेग आणखी वाढविला असून एप्रिल अखेपर्यंत बिलांची छपाई पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना यंदा वेळेवर बिले मिळणार असून महापालिका संकेतस्थळावरही बिले उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

मालमत्ता करांच्या बिलाच्या छपाईचे काम सुरू असून ते एप्रिल महिनाअखेपर्यंत पूर्ण होईल. तसेच काही मालमत्ताधारकांच्या बिलांवर देण्यात आलेले पत्ते सापडत नसल्यामुळे टपाल खात्याकडून त्यांना बिले पोहोचविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मालमत्ताधारकांना आता कर्मचाऱ्यांमार्फतच घरपोच बिले पाठविण्यात येणार आहेत.

ओमप्रकाश दिवटे, महापालिका उपायुक्त