मोकळय़ा जागी पुनर्वसन करण्याच्या ठाणे महापालिकेच्या हालचाली

ठाण्यातील मोकळी मैदाने देखभाल आणि संवर्धनाच्या नावाखाली बिल्डरांना आंदण देण्याचा निर्णय घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता शहरातील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठीही मोकळ्या जागांचा वापर करण्याचा विचार चालवला आहे. महापालिका क्षेत्रात आरक्षित भूखंड, खुली मैदाने, सुविधा भूखंड, तलावांचा परिसर, शाळांची मैदाने, ज्या ठिकाणी रस्ता संपला आहे, अशा जागा यासाठी उपलब्ध करून देता येतील का याविषयी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी शहरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. काही प्रभागांमधील रस्ते आणि पदपथही ठरावीक वेळेत फेरीवाल्यांसाठी उपलब्ध करून देता येतील का यासंबंधीची चाचपणी केली जात आहे.

ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांनी केलेल्या मारहाणीनंतर महापालिकेने शहरातील मुख्य भागातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई टाळ्या मिळवणारी असली तरी त्यास नियोजनाचे वावडे असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शनिवारी सर्वसाधारण सभेत मांडला. महापालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत बेकायदा बांधकामे उभी राहतात तसेच फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असते. त्यामुळे दिखाव्यापुरती कारवाईला अर्थ काय असा सवालही पाटील यांनी उपस्थित केल्याने विरोध पक्षांची ही टीका सत्ताधाऱ्यांसह आयुक्तांच्या जिव्हारी लागली होती. या सभेत आयुक्तांनी यासंबंधीचे धोरण ठरविले जाईल, अशी घोषणा केली होती. या पाश्र्वभूमीवर सोमवारी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेत आयुक्तांनी यासंबंधीच्या सूचना केल्या. मात्र, शहरातील मोकळी मैदाने, तलावांचे परिसर आणि शाळांची मैदाने फेरीवाल्यांसाठी खुली करण्याचा अजब प्रस्ताव मांडला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाला अनुसरून बनविण्यात आलेल्या केंद्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करतानाच ठाणे शहरासाठी र्सवकष तसेच फेरीवाल्यांच्या सर्वच घटकांना सामावून घेणारे राज्यात आदर्श ठरेल, असे फेरीवाला धोरण तयार करून १५ ऑगस्टपर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात किती फेरीवाल्यांना परवानगी देता येणे शक्य आहे, त्यांच्यासाठी कोणती जागा देता येईल, त्या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे, ठरावीक अंतरानंतर फळे, भाजीवाले, फुलवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देणे आदी मुद्दय़ांवर सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत. मोठय़ा गृहसंकुलांमध्ये भाजीवाले, फळवाले किंवा इतर फेरीवाल्यांना समाविष्ट करता येईल का याची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. धोरण आणि आराखडे तयार होत असतानाच फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याची आणि त्यांचे सांकेतांक क्रमांक तयार करण्यात यावेत. सदरचे सांकेताक क्रमांक हे फेरीवाल्याच्या व्यवसायानुसार दिले जातील. सांकेतीक क्रमांकानुसार फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करण्यात येतील. सदर ओळखपत्राचा गैरवापर झाल्यास संबंधितावर कठोर करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या. खाऊगल्लीसाठीही स्वतंत्र्य ठिकाणे आरक्षित करण्याचा विचार सुरू करण्यात आला आहे. खाऊगल्लीची ठिकाणे ही पार्क आणि मनोरंजनांची ठिकाणे, मोठी गृहसंकुले या ठिकाणी सुरू करता येतील का याबाबत विचार सुरू असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.