‘प्रभाग’फेरी – नौपाडा

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराच्या तोफा धडधडतील, आश्वासनांच्या गर्जना होतील आणि टीकेचे शंख फुंकले जातील. परंतु, या सगळ्या राजकीय ‘दंगली’मध्ये शहराला दररोज भेडसावणाऱ्या समस्यांचे काय होणार? अशाच नागरी समस्यांवर विभागनिहाय प्रकाश पाडणारी वृत्तमालिका..

झपाटय़ाने विस्तारणाऱ्या ठाणे शहराच्या पाऊलखुणा जपणारा परिसर म्हणून आजही नौपाडय़ाची ओळख सांगितले जाते. रेल्वे स्थानक, गोखले रस्ता, राम मारुती मार्ग असे व्यापारी उलाढालींचे आणि वाहतुकीच्या प्रचंड वर्दळीचे केंद्र म्हणून नौपाडा आजही इतक्या वर्षांत स्वत:चे महत्त्व शाबूत ठेवून आहे. ठाण्याच्या सुशिक्षित, सांस्कृतिक, पांढरपेशा वर्गाचे वास्तव्याचे ठिकाण असलेल्या या परिसराला काळाच्या ओघात नियोजनाच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. शहराची सर्वात जुनी वस्ती असल्याने अरुंद रस्ते, वाहनतळाच्या समस्या या भागात भेडसावणार हे ओळखून नियोजनकर्त्यांनी खरे तर खूप आधीच येथील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी गांभीर्याने पावले उचलायला हवी होती. प्रत्यक्षात आज इतक्या वर्षांत या आघाडीवर ठोस असे काही झाले नसल्याने पश्चिमेकडील नव्या-जुन्या ठाण्याचा भार नौपाडय़ावर पडू लागला आहे. त्यामुळे जुने ठाणे अशी ओळख मोठय़ा तोऱ्यात मिरविणाऱ्या या परिसरातील समस्याही जुन्याच आहेत.

स्थानक परिसरातील कोंडी

ठाणे शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जाणारा गोखले रोड आणि ठाणे स्थानक रोड या मार्गालगत असलेल्या दुकानांमुळे  या भागात वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागले आहेत.  नौपाडा भागातील बहुतांश रस्ते अरुंद असून त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. गोखले रोड, राम मारुती रोड आणि ठाणे स्थानक परिसरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचा आकडा मोठा आहे. याशिवाय, ठाणे स्थानकातून शहरातील वेगवेगळ्या भागात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गोखले मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मल्हार चौकात उड्डाण पुलाची उभारणीचे काम सुरू आहे. मात्र, अरुंद रस्त्यावर उभारलेल्या या पुलांमुळे कोंडी वाढणार आहे.

शिवसेना-भाजपमध्येच टक्कर

ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा क्षेत्रात शिवसेनेचा परांपरागत मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेची साथ सोडून येथील मतदार भाजपच्या बाजूने झुकताना दिसले. नौपाडय़ातील हिंदू कॉलनी, भास्करनगर कॉलनी, वंदना सोसायटी, चंद्रनगर, घंटाळी, विष्णूनगर, मासुंदा तलाव हा परिसर ब्राह्मण, सीकेपी तसेच गुजरातीबहुल म्हणून परिचित आहे. तर सिद्धेश्वर तलाव, कचराळी तलाव, नामदेववाडी, चंदनवाडी आणि रायगडगल्ली या परिसरात कोकणातील खेड आणि पाली भागातील रहिवासी वास्तव्यास आहेत.या पाच प्रभागांमधून एकूण दहा नगरसेवक निवडूण आले होते. मात्र, यंदा नव्या फेररचनेनुसार चार वॉर्डाच्या दोन प्रभागांमधून आठ नगरसेवक निवडूण जाणार आहेत. त्यामुळे या प्रभागातील  उमेदवारी मिळविण्यापासून उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना होणार आहे.

फेरीवाल्यांचा त्रास..

ठाणे स्थानक, गोखले रोड, गावदेवी, जांभळी नाका आणि तलावपाळी भागातील रस्ते व पदपथ फेरिवाल्यांकडून व्यापले जात असल्याने नागरिकांना चालणे कठीण होते. याशिवाय, रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. काही महिन्यांपूर्वी ठाणे स्थानक बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण केले, परंतु रुंदीकरणानंतर या भागात फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

टांग्यांची अडचण

ठाणे शहराची चौपाटी म्हणून मासुंदा तलावाची ओळख आहे. या तलाव परिसरात नागरिकांना चालण्यासाठी मोठा पदपथ आहे. तसेच तलावामध्ये बोटिंगची व्यवस्थाही केली आहे. त्यामुळे या भागात सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. पंरतु या भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे  प्रचंड कोंडी होते. त्यात नागरिकांना तलावाची सैर करण्यासाठी उभे असलेल्या टांग्यांमुळे कोंडी होत असते.

इमारतींचा पुनर्विकास

ठाणे महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वीच म्हणजेच ग्रामपंचायतीच्या काळात नौपाडय़ात अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यांपैकी अनेक इमारती धोकादायक होऊन मोडकळीस आल्या आहेत. अनेक ठिकाणी जागामालक आणि इमारतीतील भाडेकरू असा वाद असल्यामुळे इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे या भागात इमारतींच्या पुर्नवसनाचा मोठा प्रश्न आहे.

नव्या फेररचनेनुसार प्रभाग

प्रभाग क्रमांक -१२

अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क –    सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

लोकसंख्या – ५१,७००

प्रभाग क्षेत्र – सिद्धेश्वर तलाव, कचराळी तलाव, नामदेववाडी, चंदनवाडी, रायगडगल्ली.

प्रभाग क्रमांक – २१

अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

लोकसंख्या – ५०,९६३

प्रभाग क्षेत्र – हिंदू कॉलनी, भास्करनगर कॉलनी, वंदना सोसायटी, चंद्रनगर, घंटाळी, विष्णूनगर, मासुंदा तलाव.

नौपाडा भागातजलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले  असून लोकप्रतिनिधींकडे  त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. तसेच भटक्या श्वानांची संख्या मोठी असून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत.

 शीला वागळे, नौपाडा, ठाणे

 मुंबई तसेच आसपासच्या शहरांमध्ये ठाणे स्थानकातून प्रवास करणारे नागरिक नौपाडय़ातील भगवती, घंटाळी, गावदेवी आणि सहयोग या भागात बेकायदा वाहन पार्किंग करतात. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी  होते.
– ऐश्वर्या दळवी, नौपाडा, ठाणे

या भागात बेकायदा पार्किंग आणि फेरीवाल्यांचे बस्तान यामुळे नागरिकांना चालणे कठीण होते. बेकायदा फलक  लावल्याने शहराचे विद्रूपीकरण होते असून  याचा गांभीर्याने विचार व्हावा.

– नंदा जोशी, नौपाडा, ठाणे

पाचपाखाडी परिसरात जागोजागी कचरा कुंडय़ा ठेवल्या असल्या तरी  नियमित कचरा वाहून नेण्याने हा परिसर स्वच्छ राहील. या परिसरातून हरिनिवासमार्गे बहुतांश बस जातात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना बस सुविधा कमी प्रमाणात मिळते.

– कुंदन मनवे, पाचपखाडी, ठाणे