कचरा फेकल्याने व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण; पालिका मुख्यालयात आंदोलन

ठाणे महापालिकेने वर्षभरापासून लागू केलेला कचरा कर भरण्यास हरकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गुरुवारी सकाळी महापालिकेच्या घनकचरा विभागाने मांसयुक्त कचरा फेकल्याने व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास राजकीय वळण मिळाले. हा कचरा फेकणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी करत शहरभरातील व्यापाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. व्यापाऱ्यांचा हा रोष पाहून शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही या आंदोलनात उडी घेत कचरा कर रद्द करू, अशी भूमिका घेतली. दरम्यान, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या भेटीसाठी आग्रही असलेल्या व्यापाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत जयस्वाल यांनी भेट दिली नाही. अखेर अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या प्रकरणी तपास करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

ठाणे महापालिकेने गेल्या वर्षांपासून शहरातील व्यापारी, हॉटेलांना कचरा कर लागू केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी यासंबंधीच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे या कर आकारणीची अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली. दरम्यान, व्यापारी तसेच हॉटेलमालकांनी हा कर भरण्यास विरोध केला. त्यामुळे अर्थसंकल्पात या करापोटी ठेवण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने महापालिकेने गुरुवारपासून व्यापाऱ्यांच्या दुकानावर कचराफेक सुरू केली. या कचऱ्यात बीअरच्या बाटल्या, मेलेले उंदीर आणि खराब झालेल्या माशांचा समावेश असल्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून निषेध नोंदविला. तसेच दुपारनंतर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी भूमिका घेत व्यापारी आक्रमक झाले.  व्यापाऱ्यांचा जमाव महापालिका मुख्यालयाच्या दिशेने चालून गेला आणि त्यांनी  जयस्वाल यांच्या भेटीसाठी आग्रह धरला. महापौर मीनाक्षी िशदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी याप्रकरणी  बैठकीचे आयोजन केले. या वेळी भाजपचे आमदार संजय केळकर हेदेखील मुख्यालयात आले. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासमवेत बैठक घेत चौकशीच्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.