गतवेळच्या तुलनेत १५ जागांचे नुकसान; यंदा केवळ तीनच नगरसेवक पालिकेत

पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत १८ नगरसेवक निवडून आणणाऱ्या काँग्रेसचे यंदाच्या निवडणुकीत केवळ तीन नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, त्यांचे बंधू शैलेश शिंदे या दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. तर विक्रांत चव्हाण यांच्यावर सूरज परमार आत्महत्या प्रकरणाचा आरोप असतानाही ते निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची शहरात पीछेहाट झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शहरात खातेही उघडता आलेले नाही.

गेल्या दोन महिन्यांपासून शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. या प्रचारामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे तीनच पक्ष आघाडीवर होते. तसेच मनसेने शहरासह दिवा भागात वातावरण निर्मिती करून निवडणुकीच्या शर्यतीत राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेस त्यामध्येही मागेच होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १५ नगरसेवक तर मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आणि मनसे या दोन्ही पक्षातील बहुतेक नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपमध्ये उडय़ा घेतल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही पक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक राहिले होते.

ठाणे महापालिकेच्या श्रीनगर भागातील प्रभागामधून काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे आणि त्यांचे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. गेली अनेक वर्षे मनोज शिंदे हे श्रीनगर प्रभागातून निवडून येत असल्याने शहरातील मातब्बर नगरसेवक म्हणून ओळखले जातात.

यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांच्यासह चारही उमेदवारांचा पराभव झाला. शहरात केवळ काँग्रेसचे तीनच उमेदवार निवडून आले असून त्यामध्ये मुंब्य्रातील प्रभाग २६ मधून यासीन कुरेशी, दीपाली भगत आणि वर्तकनगर भागातील प्रभाग क्रमांक ७ मधून विक्रांत चव्हाण हे विजयी झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतानाही काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. तर पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दिवा आणि कोपरी भागातून मनसेचे नगरसेवक निवडून आल्यामुळे मनसेच्या नेत्यांनी या दोन्ही ठिकाणी प्रचारावर जोर दिला होता. शहराच्या तुलनेत या दोन्ही ठिकाणी मनसेला एखादी जागा मिळेल, अशी

शक्यता पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र या दोन्ही ठिकाणी पराभव झाल्याने मनसेला शहरात यंदा खातेही उघडता आलेले नाही.

काँग्रेसचे विजयी उमदेवार

*  यासीन कुरेशी : प्रभाग क्र. २६ (मुंब्रा)

* दीपाली भगत : प्रभाग क्र. २६ (मुंब्रा)

* विक्रांत चव्हाण : प्रभाग क्र. ७ (वर्तकनगर)