शहरातील पांढरपेशा वस्तीतून सेनेला पाठिंबा नाही; नागरी विकासाबाबतच्या उदासीनतेचा फटका

भाजपशी फारकत घेऊन स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेनेने ‘ठाणे’ राखले असले तरी, स्पष्ट बहुमत मिळवण्यात त्यांना यश मिळालेले नाही. महापालिका निवडणुकीच्या निकालावरून पांढरपेशा समाजाने शिवसेनेला नाकारल्याचे दिसून येत आहे. एकीकडे वागळे, लोकमान्यनगर, दिवा, कळवा या कनिष्ठ मध्यमवर्गीयबहुल परिसरात सेनेने जोरदार यश मिळवले असताना, हिरानंदानी, नीळकंठ, नौपाडा या सुशिक्षित आणि सुखवस्तू नागरिकांची वस्ती असलेल्या भागांत भाजपने सरशी साधल्याचे दिसून येत आहे.

एरवी युतीने लढताना नेहमीच शिवसेनेच्या वाटय़ाला येणाऱ्या जुन्या ठाण्यात भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाबाबत दाखविलेली उदासीनता, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आश्वासन देऊनही कायम राहिलेला टोलचा जाच, पुन्हा पुन्हा तेच ते उमेदवार, जुन्या ठाण्यातील प्राथमिक सुविधांकडे केलेले दुर्लक्ष आदींमुळे नौपाडय़ातील प्रभाग क्र. २१ मधील चारही जागा सेनेने गमावल्या. संजय वाघुले यांचा अपवाद वगळता या प्रभागात भाजपचे अन्य तीन उमेदवार नवखे होते. मात्र तरीही विलास सामंत, हिराकांत फर्डे, सीमा रजपूत आणि सुजाता पाटील या दिग्गजांचा त्यांनी पराभव केला. त्याच त्या उमेदवारांना पुन्हा पुन्हा संधी दिली जात असल्याने नौपाडा विभागातील तरुण शिवसैनिकांमध्येही नाराजी होती. त्याचाही परिणाम येथील निवडणूक निकालातून दिसून आला.   वसंत विहार, सिद्धांचल, पवारनगर या सुशिक्षितांची बहुसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये शिवसेनेने बाजी मारली असली तरी अतिशय नवखे उमेदवार असूनही भाजपने चांगली लढत दिली.

सुधाकर चव्हाण यांचा विजय सुकर व्हावा म्हणून भाजपने मुद्दामहूनच येथील प्रभागात फारसे लक्ष दिले नसल्याचे बोलले जाते. मात्र पक्षाची ती मात्रा चालली नाही. वर्षांनुवर्षे निवडून येणाऱ्या भाईंचा पराभव करून ताई निवडून आल्या.त्यामुळे या विभागात ‘तेलही गेले आणि तूपही’ अशी भाजपची अवस्था झाली. वृंदावन, श्रीरंग परिसरातील पांढरपेशा समाजानेही मोठय़ा प्रमाणात भाजपच्या कमळावर पसंतीची मोहोर उमटवली.