जितेंद्र आव्हाड यांच्या वर्चस्वात घट

कळवा-मुंब्रा

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळव्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा आणि मुंब्रा परिसरातील वर्चस्व कायम राखले. मुंब्य्रातील २० पैकी १५ जागा जिंकत राष्ट्रवादीने या परिसरात  दबदबा कायम ठेवला; परंतु ‘एमआयएम’ पक्षाने या ठिकाणी शिरकाव केल्याने आव्हाडांच्या आनंदावर विरजण पडले. विटाव्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जागेवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका मनीषा साळवी यांचा पराभव झाला.

विटावा परिसरातून यंदा आव्हाडांना मोठय़ा विजयाची खात्री होती. मात्र, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले. येथून शिवसेनेच्या प्रियंका पाटील आणि पूजा करसुळे यांचा विजय झाल्या. खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राजा गव्हारी यांची पूजा ही बहीण आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला यशाची आशा होती. याशिवाय खारेगाव पट्टय़ात शिवसेनेचे उमेश पाटील, अनिता गौरी यांचे पॅनेल निवडून आल्याने आव्हाडांपुढे या ठिकाणचे आव्हान कायम आहे. या भागात मलनिस्सारण प्रकल्पांच्या उभारणीमुळे रहिवासी नाराज होते. त्याचा फटका शिवसेनेला बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. कळव्यातील सभेत शरद पवार यांनी या प्रकल्पास भेट देऊन तेथील रहिवाशांसोबत संवाद साधला होता.

खर्डी, डायघर, कौसामध्ये राष्ट्रवादी

ठाणे  : दिव्यास लागून असलेल्या खर्डी, डायघर, कौसा येथे मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेची घौडदौड रोखल्याचे पाहायला मिळाले. खर्डी, डायघर भागांत मात्र शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमीत यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील आणि लकी कंपाऊंड दुर्घटनेत अटक झालेले हिरा पाटील यांच्या पत्नीचा येथून मोठा विजय झाला आहे. हिरा पाटील यांनी पाच वर्षांपूर्वी आमदार भोईर यांना याच मतदारसंघातून पाच वर्षांपूर्वी अस्मान दाखविले होते. त्यामुळे या वेळी हिरा यांच्या पराभवासाठी आमदार भोईर यांनी जोरदार प्रयत्न सुरूकेले होते. मात्र हिरा यांचा या भागातील करिश्मा अद्यापही कायम असल्याचे चित्र पुन्हा दिसून आले.

महापालिकेच्या प्रभाग रचनेत तीन जागांचा अवघा एकमेव प्रभाग म्हणून डायघरची निर्मिती झाली होती. गुरुवारी सकाळी या प्रभागातील मतमोजणी प्रथम सुरू झाली. सुरुवातीपासूनच येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेत शिवसेनेला धक्का दिला. राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक बाबाजी पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांचे पुत्र सुमित यांना पराभवाचा धक्का देताच मतमोजणी केंद्रालगत मोठय़ा आशेने उभे असलेल्या शिवसैनिकांनी काढता पाय घेतला. या मतदारसंघात कौसा या मुस्लीमबहुल क्षेत्रातून सुमारे पाच हजारांच्या घरात मतदान झाले होते.

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले सुभाष भोईर यांना येथून चांगल्या मतांची अपेक्षा होती. मात्र मुस्लीम मतदारांनी भोईर यांचे चिन्हे नाकारत बाबाजी यांच्या पारडय़ात मतांचे दान टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पॅनलमधील दुसऱ्या एका जागेवर स्थानिक नगरसेवक हिरा पाटील यांच्या पत्नी चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या. हिरा पाटील आणि सुभाष भोईर हा सामना खर्डी, डायघरमध्ये नेहमीच चर्चेचा ठरतो. यंदाही हिरा यांनी भोईरांना दाखविलेल्या अस्मानाची चर्चा येथे रंगली आहे.