ठाण्याचा गड राखण्यात शिवसेनेला यश आले आहे. शिवसेनेने ठाण्यात १३१ पैकी ६७ जागांवर विजय मिळवला असून भाजपला मात्र ठाण्यात धक्का बसला आहे. ठाण्यात भाजप तिस-या स्थानी फेकला गेला. राष्ट्रवादीने ३४ जागांवर बाजी मारत दुस-या स्थानी झेप घेतली आहे.

ठाण्यातील ३३ पॅनेलमधून १३१ नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. १३१ जागांसाठी तब्बल १, १३४ उमेदवार रिंगणात होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मतदानात ५९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे मतदानाचा वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. शहरातील १२ मतमोजणी केंद्रावर गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर पक्षाला १९७०च्या दशकात सेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली ती ठाण्यात. १९७४ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले. तेव्हापासून शिवसेना आणि ठाणे ही समीकरण जुळले. मधला काही काळ अपवाद वगळता ठाण्यावर शिवसेनेचेच वर्चस्व राहिले. शिवसेनेच्या या भक्कम गडाला सुरुंग लावण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर होते. विधानसभा निवडणुकीत ठाणे शहरातून भाजपने विजयाची नोंद करत शिवसेनेला हादरा दिला. या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला होता.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अन्य पक्षांमधील नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. आयारामांच्या मदतीने शिवसेनेला आव्हान देण्याचा डाव भाजपने खेळला होता. मात्र यामुळे पक्षातील निष्ठावंत नेते नाराज होते. स्थानिक आमदार आणि ज्येष्ठ नगरसेवकांना डावलून तिकिट वाटप झाले होते. ठाण्याची जबाबदारी असलेले राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतलेल्या वादग्रस्त  निर्णयावर पक्षातून टीका सुरु होती. रविंद्र चव्हाण यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत पक्षातील वाद पोहोचला होता.

भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी पसरली असतानाच खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिवा आणि ठाण्यामध्ये सभा घेतली. तर उद्धव ठाकरे आणि दिवामध्ये राज ठाकरे यांनीदेखील सभा घेतली होती. ठाणे शहरातील विकासकामामुळे मतदार आम्हालाच साथ देतील असा शिवसेनेचा दावा होता. पण ठाण्यात शिवसेनेवर घराणेशाहीचे आरोप झाले. राष्ट्रवादीतून आलेल्या देवराम भोईर यांच्या कुटुंबात चार जणांना उमेदवारी देण्यात आली. तर माजी महापौर एच एस पाटील यांच्या कुटुंबीयांनाही तिकिट दिले गेले. याशिवाय एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे, रवींद्र फाटक यांच्या पत्नी, खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि पुतण्याला उमेदवारी देण्यात आली होती.

घराणेशाही तसेच ठाणे महापालिकेतील गलथान कारभारावरुन शिवसेनेची कोंडी करण्यात भाजप कमी पडल्याचे या निवडणुकीत दिसून आले. ठाणे महापालिकेचे आयुक्त जयस्वाल हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या कामाचे श्रेय भाजप नेत्यांना घेता आले असते. पण यातही भाजप नेत्यांना अपयश आले. ठाण्यातील भाजपची निराशाजनक कामगिरी हा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासाठी हादरा मानला जात आहे.

हे आहेत ठाण्यातील विजयी उमेदवार

भाजपला फक्त २३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर मनसेचे इंजिन ठाण्यात यार्डातच रखडले. मनसेला खातेच उघडता आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सभेमुळे दिव्याला यंदाच्या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले होते. दिव्यातील ११ पैकी ८ जागांवर शिवसेना तर ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला.

ठाण्यात भाजपला धक्का बसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने समाधानकारक कामगिरी केली. राष्ट्रवादीला ३४ जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला ३४ जागांवर विजय मिळाला होता. एमआयएमने मुंब्य्रात २ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रवेश केला आहे.  गेल्या काही महापालिका निवडणुकीत ठाणेकर मतदारांनी शिवसेनेला एकहाती सत्ता दिली नव्हती. पण यंदाच्या निवडणुकीत हे चित्र बदलले आहे. १३१ नगरसेवकांच्या ठाण्यात ६६ ची मॅजिक फिगर आहे. शिवसेनेला ६७ जागांवर विजय मिळाला आहे. या विजयामुळे शिवसेनेला काही अंशी दिलासा मिळाला आहे.