ठाणे, नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदर या शहरातील तब्बल ५० पेट्रोल पंपमालकांनी राज्य शासनाचा अकृषिक कर थकविल्याप्रकरणी ठाणे तहसील विभागाने पेट्रोल पंपांना सील ठोकण्याची कारवाई सोमवारपासून सुरू केली. या कारवाईने धास्तावलेल्या पेट्रोल पंपमालकांनी तहसील कार्यालयात धाव घेऊन कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारपासून पेट्रोल पंप बंद ठेवण्याची भूमिका घेतली. तहसील प्रशासनाने कर भरण्यास काही दिवसांची वाढीव मुदत दिल्याने पंपमालकांनी बंदचा निर्णय मागे घेतला. मात्र ठाणे महापालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपाबाहेर गर्दी केली होती.

ठाणे, नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदर ही शहरे ठाणे तहसील विभागाच्या अखत्यारीत येतात. या शहरांमध्ये अकृषिक कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांवर गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल ५० पेट्रोल पंपमालकांनी कर थकविला आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ५० पेट्रोल पंपमालकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये घोडबंदर, ओवळे, तुर्भे, सानपाडा, वाशी, बेलापूर, नेरुळ, कोपरखैराणे, ऐरोली, घणसोली, पाचपाखाडी, माजीवाडा, मानपाडा, नौपाडा, काशिगाव, नवघर, उत्तन, दहिसर, पिंपरी आणि भाईंदर या भागांतील पेट्रोल पंपांचा समावेश आहे. ठाणे तहसील विभागाने नोटिसा बजावल्यानंतरही पंपमालकांनी थकीत रकमेचा अद्याप भारणा केलेला नाही. त्यामुळे सोमवारपासून तहसील प्रशासनाने पेट्रोल पंप सील करण्याची कारवाई सुरू केली असून यामध्ये ठाण्यातील बाबुभाई पेट्रोल पंपाला सील ठोकण्यात आले. या पंपाने दोन लाख ८० हजारांचा अकृषिक कर थकविला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पेट्रोल पंपमालकांनी ठाणे तहसील कार्यालयात धाव घेऊन तहसीलदार के. के. भदाणे यांची भेट घेतली. तसेच कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारपासून पेट्रोल पंप बंद ठेवण्याची भूमिका घेतली. दरम्यान, अकृषिक कर भरण्यासाठी ठाणे तहसील प्रशासनाने वाढीव मुदत दिल्याने मंगळवारपासून पंप बंद ठेवण्यात येणार नसल्याचे ठाणे व पालघर जिल्ह्य़ातील पेट्रोल-डिझेल असोशिएशनचे वरिष्ठ  उपाध्यक्ष राजू मुंदडा यांनी दिली. तसेच पेट्रोल पंपमालकांना अकृषिक कर भरण्यासाठी वाढीव मुदत दिल्याच्या वृत्तास ठाणे तहसीलदार के. के. भदाणे यांनी दिली.

ठाणे शहरातील पेट्रोल पंपांना थकीत अकृषिक कराचा भरणा करण्याबाबत दोन महिन्यांपूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. मात्र या कारणासाठी पंप बंद करून नागरिकांची कुठलीही गैरसोय केली जाणार नाही. तसेच पंपचालकांना हा कर भरण्यासाठी अवधी देण्यात आला आहे.

सुदाम परदेशी, उपविभागीय अधिकारी