पेट्रोल चोरी करून ग्राहकांची लुटमार करणाऱ्या पंपांविरोधात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून गेल्या चार दिवसांपासून विशेष मोहिमेंतर्गत कारवाई सुरू असून या मोहिमेत बुधवारी कर्जत, मुरबाड आणि पडघा भागातील तीन पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, ठाण्यातील तीन हात नाका भागातील पंपासह आणखी पाच ते सहा पेट्रोल पंपांची तपासणी पथकाकडून सुरू होती. या मोहिमेत आतापर्यंत एकूण १३ पंपांना टाळे ठोकण्याची तर सात जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे आणि डोंबिवली शहरामध्ये पेट्रोल चोरी करणाऱ्या दोन पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चार दिवसांपूर्वी कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यातील विविध शहरामध्ये अशाचप्रकारे पेट्रोल चोरी होत असल्याची माहिती मिळताच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने पेट्रोल चोरी करणाऱ्या पंपांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये गेल्या तीन दिवसात ठाणे, पुणे, खोपोली, नाशिक, भिवंडी, बदलापूर  या शहरातील पंपांवर कारवाई करण्यात आली असून बुधवारीही दिवसभर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून कारवाई सुरू होती. त्यामध्ये कर्जत, मुरबाड आणि पडघा भागातील तीन पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यात आली तर ठाण्यातील तीन हात नाका भागातील पंपासह आणखी पाच ते सहा पेट्रोल पंपांची तपासणी पथकाकडून सुरू होती. पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये मायक्रोचीप बसवून पेट्रोल चोरी होत असल्याची बाब सुरुवातीला उघड झाली होती. मात्र, त्यानंतर विशिष्ठ संकेताच्या माध्यमातून पेट्रोल चोरी होत असल्याचे समोर आले होते.

कारवाईला विरोध नाही..

पेट्रोल चोरीच्या तपासणीचा अहवाल येण्याआधीच पोलीस पंपचालकांना आरोपी म्हणून घोषित करत असल्याचा आरोप ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ातील पेट्रोल डिलर्स असोशिएशनचे सचिव केऊर परिघ यांनी बुधवारी केला. तपासणी अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत पंपचालकांना अटक करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. ठाणे पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला आमचा विरोध नाही आणि पेट्रोल चोरून ग्राहकांना लुटणाऱ्या पंपचालकांनाही आमचा पाठींबा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पेट्रोल भरणाऱ्या यंत्राच्या देखभाली व दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंपन्यांनी यंत्राची तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.