इमारतीच्या गच्चीवरून पादचाऱ्यांवर पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या वा फुगे भिरकवणाऱ्या टोळक्यांना आवर घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी यंदा अशा इमारतींमधील सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. एखाद्या इमारतीमधून फुगे भिरकवल्याची तक्रार आली, तर संबंधित असोसिएशनच्या अध्यक्ष किंवा सरचिटणीस असलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवावा लागणार आहे. त्यामुळे होळी अथवा धुळवडीच्या दिवशी गच्चीच्या दरवाजाला टाळे ठोका अथवा तेथून फुग्यांचा मारा होणार नाही, याची काळजी बाळगा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
धुलीवंदनाला अजून काही दिवस शिल्लक असले, तरी नेहमीप्रमाणे यंदाही धुळवडीचा ‘कार्यक्रम’ सुरू झाला आहे. रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या अंगावर फुगे अथवा रंग फेकणे, हा यातील सर्रास होणारा प्रकार आहे. पाण्याने भरलेले फुगे लागून अथवा त्यातील घाणमिश्रित पाणी डोळय़ांत जाऊन पादचारी जखमी होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. विशेषत: महिला वर्गाला अशा ‘फुगेफेकूं’चा अधिक त्रास होतो. या पाश्र्वभूमीवर ‘फुगेफेकूं’चे मुख्य आश्रयस्थान असलेल्या इमारतींच्या गच्च्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार सर्व इमारतींच्या सोसायटी पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येत असून, ज्या इमारतीच्या गच्चीवरून पाणी किंवा रंगाने भरलेले फुगे फेकल्याची तक्रार येईल, त्या इमारतीच्या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून शहरात गस्त वाढवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असे ठाण्याचे प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.
रंगविक्रेत्यांनाही नोटिसा
ठाण्यातील रंगविक्रेत्या व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या आरोग्यास घातक असलेले केमिकलयुक्त रंग आणि पाण्याचे फुगे मारण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांची विक्री थांबवा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा स्वरूपाच्या नोटिसा बजाविण्यात येत आहेत, अशी माहिती ठाण्याचे प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
नीलेश पानमंद, ठाणे

फुगा मारला तर काय होऊ शकते?
फुग्याच्या माऱ्यामुळे एखादी व्यक्ती जखमी झाली तर संबंधितांवर भा. दं. संहितेमधील ३३६, ३३७ आणि ३३८ या कलमानुसार कारवाई. दोषी आढळल्यास दोन वर्षांची शिक्षा.  
रेल्वे पोलिसांचे झोपडपट्टय़ांना आवाहन
रेल्वे रुळालगत असलेल्या झोपडपट्टय़ांमधून लोकलमधील प्रवाशांच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे फेकण्यात येतात.  या पाश्र्वभूमीवर अशा झोपडय़ांमधील नागरिकांना फुगे मारू नका, असे आवाहन आणि अशी कृत्ये केली तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेल्वेचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिला आहे.