सूचना, तक्रारींबाबत तात्काळ प्रतिसाद; पालकमंत्र्यांकडून उद्घाटन
नेते, अभिनेते आणि लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून ओळख असलेल्या ट्विटरवर प्रशासकीय यंत्रणांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर खात्याला अल्पावधीत लोकप्रियता मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर ट्विटर खाते सुरू करून ट्विटरच्या जगात प्रवेश केला आहे. ठाणे पोलिसांच्या या ट्विटर खात्यावरून नागरिकांना दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तात्काळ प्रतिसाद देण्यात येणार आहे. त्यासाठी सहा महिला पोलिसांचे विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. रविवारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ट्विटर खात्याची सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांतून ठाणे पोलिसांच्या या ट्विटर खात्याचे स्वागत करण्यात आले आहे.
ठाणे पोलिसांविषयी सूचना, तक्रारी, अनुभव, भावना आणि त्यांच्याकडून अपेक्षित मदत मिळवण्यासाठी ट्विटर या ऑनलाइन समाज माध्यमाचा नवा पर्याय ठाण्यातील नागरिकांसाठी रविवारपासून सुरू झाला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ट्विटर खात्याचे औपचारिक उद्घाटन केले.
त्या वेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या @ThaneCityPolice या खात्याला एका दिवसामध्येच पसंती मिळू लागली असून सामान्य नागरिक, मराठी चित्रपटसृष्टी आणि इतर मान्यवरांनी ठाणे पोलिसांच्या स्वागताचे ट्वीट केले आहे. श्रेयस तळपदे, आरजे मलिष्का, अमृता पत्की यांसारख्या मान्यवरांनीही ठाणे पोलिसांचे स्वागत केले आहे.

सायबर कक्षाच्या कार्यालयातून देखरेख..
ठाणे पोलिसांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर नुकतीच ‘ठाणे पोलीस कमिशनरेट’ या पेजची सुरुवात केली आहे. त्यानंतर आता ट्विटरवरही पोलिसांनी आपले खाते उघडले आहे. यापूर्वी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांचे तसेच राज्यातील अन्य काही जिल्ह्य़ांतील पोलिसांचे ट्विटर खाते होते. त्यामुळे ठाणे पोलिसांनी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हे खाते उघडले. सायबर कक्षाच्या कार्यालयातून या खात्याचे काम पाहिले जाणार आहे.