घोडबंदरवासीयांना विरंगुळ्यासाठी नवीन ठिकाण

कळव्यातील खाडीकिनारी भागात पारसिक चौपाटी उभारण्याचा प्रकल्पास वेग दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता घोडबंदरमधील नागलाबंदर भागात चौपाटी विकसित करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. या भागात जेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी या कामाचा विस्तार करून चौपाटीचा विकास करता येऊ शकेल का याची चाचपणी करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

कळव्यातील पारसिक भागातील खाडीकिनारा परिसरात बेकायदा बांधकामे वाढली होती. ही बांधकामे हटवून त्याठिकाणी चौपाटी उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केला होता. त्यानुसार येथील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करत महापालिकेने चौपाटी उभारणीचा मार्ग प्रशस्त केला आहे. गुजरातमधील साबरमती नदी आणि सिंगापूरमधील चौपाटीच्या धर्तीवर पारसिक चौपाटी विकसित करण्यात येणार असून त्यासाठी आराखडाही तयार करण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत ही चौपाटी तयार करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

कळव्याच्या एका टोकावर चौपाटी विकसित करत असताना शहराचे दुसरे टोक असलेल्या घोडबंदर भागातील नागला बंदरावर अशीच चौपाटी उभारता येईल का याची चाचपणी आता सुरू करण्यात आली आहे. घोडबंदर भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत नागलाबंदरचा किनारा येतो. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात सायंकाळच्या वेळेत नागरिक फिरायला येतात. त्यामुळे या भागात चौपाटी उभारण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश  जयस्वाल यांनी दिले आहेत.

कामाच्या दर्जाविषयी तक्रारी नकोत..

शहरातील वेगवेगळ्या भागांत सुरू असलेल्या विकास कामांची आयुक्त जयस्वाल यांनी शनिवारी पाहणी केली. त्या वेळी ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच त्यातील दर्जाविषयी तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.  कॅडबरी जंक्शनमार्गे, बेथनी हॉस्पिटल आणि बेथनी हॉस्पिटल ते पवारनगर, पवारनगर ते डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह या जोड रस्त्यांचीही त्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या कामाची पाहणी केली.