१७ वर्षांखालील गटात कामगिरी

प्रतिनिधी, ठाणे

योंगमुडो असोशिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या पुढाकाराने ठाण्यात पार पडलेल्या पहिल्या नंदकुमार जोशी योंगमुडो राज्यस्तरीय स्पर्धा-२०१५ मध्ये सतरा वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात ठाणे जिल्ह्य़ाने प्रथम क्रमांक मिळवला तर अहमदनगर जिल्ह्य़ाने द्वितीय क्रमांक आणि नांदेड जिल्ह्य़ाने तृतीय क्रमांक पटकावला.

योंगमुडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या अधिपत्याखाली ही राज्यस्तरीय स्पर्धा ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित घंटाळी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून ३५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

काय आहे योंगमुडो?

योंगमुडो ही कला साऊथ कोरिया येथील यॉग इन युनिव्हर्सिटी या संस्थेतील इंटरनॅशनल योंगमुडो फेडरेशन या नावाने प्रचलित आहे व भारतात इंडियन योंगमुडो फेडरेशनच्या वतीने योंगमुडो या खेळाचा प्रचार व प्रसार केला जात आहे.

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाची बाजी

प्रतिनिधी, ठाणे

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठाच्या मुलींच्या खो-खो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला मात देत विजेतेपद पटकावले आहे. विजेतेपदासोबतच मुंबई विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठीही पात्र झाला असून पश्चिम विभागात असलेले आपले प्रथम क्रमांकाचे स्थान मुंबईने यंदाही कायम राखले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या आंतरविद्यापीठीय खो-खो स्पर्धेसाठी पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे तीन संघ पात्र ठरले आहेत.

गोवेली महाविद्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत पश्चिम विभागातील पाच राज्यांतील मुलींचे ३१ संघ सहभागी झाले होते. यातून अखेरच्या साखळी सामन्यांसाठी मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गुजरातच्या सरदार पटेल विद्यापीठाचा संघ पात्र ठरला होता. त्यातून गुणांच्या आधारावर विजेतेपदासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने कोल्हापूरच्या संघाला पराभूत करत विजेतेपद मिळवले, तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सरदार पटेल विद्यापीठ यांच्यातील सामन्यात पुणे विद्यापीठाने बाजी मारली. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ दुसऱ्या स्थानी तर पुणे विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे.

‘बॅडमिंटनपटूंसमोर भविष्य घडविण्याची संधी’‘बॅडमिंटनपटूंसमोर भविष्य घडविण्याची संधी’

प्रतिनिधी, ठाणे

बॅडमिंटन हा जगप्रसिद्ध खेळ असून या खेळाच्या निमित्ताने खेळाडूंसमोर भविष्य घडविण्याची चांगली संधी उपलब्ध आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी ठाण्यात व्यक्त केले. ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ ठाणेतर्फे ठाणे जिल्हा खुल्या बॅडिमटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांगर हे उपस्थित होते.

ठाणे जिल्हा खुली बॅडिमटन स्पर्धा नुकतीच नाताळच्या सुट्टीमध्ये ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणाच्या खंडू रांगणेकर बॅडिमटन हॉलमध्ये पार पडली. ही स्पर्धा १० वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील मुला व मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी झाले. यावेळी स्पर्धकांनी आपल्या खेळावर लक्ष देत खेळादरम्यान होणाऱ्या चुका कमी कशा होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

 

प्रतिनिधी, कल्याण</strong>

सिध्दिविनायक युवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही टिटवाळा मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. क्रीडा सप्ताहानिमित्ताने ही स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेतून बेटी बचाव, पर्यावरण संरक्षण व आरोग्यासाठी दौड आदी संदेश देण्यात आले. टिटवाळा परिसरातील सर्व शाळांमधील मुले या स्पर्धेत मोठय़ा प्रमाणात सहभागी झाली होती. ८५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंद केली होते. ९ वर्षांवरील मुले व मुली अशा एकूण आठ गटांत ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष विनायक कोळी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.