ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांना दंडाच्या आकारातील प्रशासकीय रकमेतून सूट पदरात पाडून घेण्यासाठी येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. सद्य:स्थितीत विहित मुदतीत मालमत्ता कराची रक्कम भरणा न करणाऱ्या मिळकतधारकास थकीत रकमेवर प्रत्येक महिन्याला दोन टक्क्यांनुसार प्रशासकीय आकार आकारला जातो. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत थकीत रक्कम भरल्यास प्रशासकीय आकार पूर्णपणे माफ केला जाणार आहे. यापूर्वी ही मुदत ३१ जानेवारी अशी होती.  
महापालिकेच्या धोरणानुसार मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर दोन टक्के इतका प्रशासकीय आकार लावण्यात येतो. मालमत्ता कराची वसुली वाढावी यासाठी हा आकार कमी करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार जे मिळकतधारक मार्च २०१५ पर्यंत देय होणारा थकीत मालमत्ता कर चालू आर्थिक वर्षांच्या मागणीसह पूर्णपणे भरतील त्यांना दंडावर आकारला जाणारा प्रशासकीय आकार पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच जे मिळकतधारक फेब्रुवारी २०१५ पर्यंत देय होणारा मालमत्ता कर आर्थिक वर्षांच्या मागणीसह प्रशासकीय आकाराच्या ७५ टक्के भरतील त्यांना २५ टक्के मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत निश्चित करण्यात आली होती.