ठाणे महानगरपालिकेचा २०१७-१८ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत सादर केला. या वेळी महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर राजेश मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त रणखांब आणि सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. अर्थसंकल्पात व्हिजन प्लॅन, विकास योजनेची अंमलबजावणी, रस्ते विकास आणि वाहतूक सुधारणेवर भर देण्यात आला आहे. ठाण्यातील गंभीर प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात येणार आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गुगलसोबत करार करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी गुगलशी करार करणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

शहरातील विकास कामे; तसेच स्मार्ट शहर योजनेशी संबंधित सर्व बाबी या अर्थसंकल्पात विचारात घेतल्या असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले. निवासी मालमत्तेत वाढ झाली असून १२ टक्क्यांवरून २२ टक्के, तर बिगर निवासी मालमत्तेतही वाढ करण्यात आली आहे. तर ‘अर्ली बर्ड इन्सटीव्ही स्कीम’च्या माध्यमातून करात विशेष सवलत मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीने नवीन बांधकामांना परवानगी घेणे शक्य होणार असून, निवासी मालमत्तांसाठी मीटरनुसार पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.

विकास योजनेची अंमलबजावणी, रस्ते विकास आणि वाहतूक सुधारणेवर भर, चौपाटी विकास, २४x७ पाणी पुरवठा, स्मार्ट मिटरिंग, घोडबंदर आणि दिवा परिसरात भुयारी गटार योजना फेज ४, विद्युतीकरणावर भर आदी घोषणा ‘व्हिजन प्लॅन’ अंतर्गत करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात ५२.४२२ किलोमीटरच्या एकूण १०९ रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी गुगलसोबत करार करून वाहतूक नियंत्रित करणारी ठाणे महापालिका देशातील पहिली ठरणार आहे. मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी प्रभाग समिती, तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपये, तर पारसिक चौपाटीसाठी ५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शाही धरण बांधण्यासाठी २५ कोटींची तरतूद आहे. २४x७ तास पाणी पुरवठा योजनेसाठी मीटर लावण्यात येणार आहेत. यासाठी नागरिकांकडून ५०% रक्कम घेतली जाणार आहे. चार टप्प्यांत ही रक्कम भरण्याची तरदूत असेल. तर महानगरपालिका ५०% रक्कम देणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर होईल, तितकेच पैसे नागरिकांना भरावे लागणार आहेत. शहरात महिला स्वच्छतागृहांसाठी ३ कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य संवर्धन व मनोरंजनाकरिता सार्वजनिक उद्यानांचा विकास तसेच पार्किंगसाठी ज्युपिटर हॉस्पिटलजवळ पार्किंग हब उभारण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी व्यायामशाळा आणि जिम्नॅस्ट सेंटर आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसेच शॉपिंग प्लाझा आदींसाठी विशेष तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली. कासारवडवली, कळवा, खिडकाळी आदी पोलीस ठाण्यांचे बांधकामही लवकरच पूर्ण होणार आहे. शहरात चित्रिकरणासाठी अद्ययावत स्टुडिओ, कन्व्हेन्शन सेंटर, कम्युनिटी आणि मंगल कार्यालय उभारण्याचा मानस आयुक्तांनी केला. शहराची ओळख राज्य व राष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी शहराचे ब्रँडिंग केले जाणार आहे. तसेच भिंती रंगवा अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जाणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी आठ कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तर झोपडपट्टी कचरामुक्त करण्यात येणार आहे.