ठाणे स्थानक परिसरात कार्यरत असलेल्या रिक्षाचालकांच्या काही लुटारू टोळ्यांकडून प्रवाशांना मनमानी भाडय़ाची रक्कम सांगितली जात असून अशा रिक्षाचालकांवर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे, ठाणे वाहतूक पोलिसांच्या चौकीपासून काही अंतरावरच या रिक्षाचालकांच्या टोळ्या उभ्या असतात आणि बिनधास्तपणे त्यांच्याकडून प्रवाशांना अगदी जवळच्या अंतरासाठीही शंभर ते दीडशे रुपये सांगितले जातात. या कारणावरून प्रवाशांसोबत त्यांची हुज्जतही होते, पण कामाच्या गडबडीमुळे अनेक जण तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. यामुळे रिक्षाचालकांच्या या टोळ्यांचे फावत असून त्यांच्याकडून लुटीचा उद्योग बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे चित्र आहे.
ठाणे येथील स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली रिक्षा थांबा उभारण्यात आला असून तेथून अनेक प्रवासी रिक्षामधून वाहतूक करतात. रिक्षाची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून स्थानक परिसरात रिक्षा मार्गिका तयार करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांसाठी थांबाही तयार करण्यात आला असून तिथे प्रवासी रांगेत उभे असतात. मार्गिकेमधून
रिक्षा येताच प्रवासी त्यामध्ये बसून इच्छित स्थळी जातात. त्यामुळे स्थानक परिसरातील रिक्षा वाहतुकीस काहीशी शिस्त लागल्याचे चित्र होते. असे असतानाच रिक्षा थांब्याच्या पुढील बाजूस आता काही रिक्षा उभ्या राहत असून त्या प्रवाशांची बिनधास्तपणे वाहतूक करीत आहेत.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या चौकीपासून काही अंतरावरच या रिक्षा उभ्या असतात. गर्दीच्या वेळेत रिक्षा थांब्यावरील रांग चुकवण्यासाठी प्रवासी या रिक्षांकडे वळतात. स्थानक परिसरात नवीन येणारे प्रवासीही याच रिक्षांकडे वळतात. त्याचाच फायदा हे रिक्षाचालक घेऊ लागले असून प्रवाशांकडून मनमानी भाडे सांगतात. मल्हार टॉकीज, हरिनिवास अशा अगदी जवळच्या प्रवासासाठी ते सुमारे शंभर ते दीडशे रुपयांची मागणी करतात. विरोध करणाऱ्या प्रवाशांशी रिक्षाचालकांची भांडणे, मारामाऱ्या होण्याचे प्रकारही येथे घडले आहेत.

याबाबत अद्याप कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. मात्र, अशा रिक्षाचालकांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल. तसेच अशा रिक्षाचालकांविरोधात नागरिकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारी कराव्यात.
– पी. व्ही. मठाधिकारी, सहायक पोलीस आयुक्त, ठाणे वाहतूक शाखा
ठाणे स्थानक ते लोकमान्यनगर या मार्गावर शेअर रिक्षा चालविण्यात येत असून या मार्गासाठी प्रत्येकी १८ रुपये भाडे आकारण्यात येते. मात्र, अलिकडे रिक्षाचालकांनी या मार्गाचे विभाजन केले असून ठाणे स्थानक ते नितीन कंपनी आणि नितीन कंपनी ते लोकमान्यनगर असा मार्ग सुरू केला आहे. या दोन्ही प्रवासांसाठी प्रत्येक प्रवाशांकडून प्रत्येकी १२ रुपये आकारले जातात.